मुंबई violence against minor girls : बदलापूरमध्ये एका शाळेत 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचारकरण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचं तीव्र पडसाद मुंबईसह राज्यभर उमटताहेत. अत्याचाराच्या घटना वाढत असून घृणास्पद कृत करणाऱ्यांच्या मनात कायद्याची भीती राहिली नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या नराधमांना कायद्याची भीती नसल्यामुळं, ते असं राक्षसी कृत्य करण्यास धजवत आहेत, असं संतप्त नागरिकांचं म्हणणे आहे. दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये बलात्कार, लैगिंक अत्याच्याराच्या घटनांमध्ये झपाट्यानं वाढ होतानाचं भयावह चित्र आहे. अशा घटना घडल्यानंतर यामध्ये राजकीय हस्तक्षेपही होताना दिसत आहे.
गेल्या पाच वर्षातील अत्याचाराची आकडेवारी (ETV BHARAT MH DESK) बदलापूर :बदलापुरातील एका शाळेत 12 तसंच 13 ऑगस्ट रोजी शाळेतील सफाई कर्मचाऱ्यानं दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केले. यानंतर 16 ऑगस्ट रोजी घटनेबाबत गुन्हाची नोंद करण्यात आली. पण, पीडित कुटुंबाला तब्बल 12 तास पोलीस स्टेशनमध्ये थांबवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस त्यांची तक्रार घेत नव्हते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीला सध्या न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. पण, आरोपीच्या फाशीच्या मागणीसाठी मंगळवारी बदलापुरात संतप्त लोकांनी तीव्र आंदोलन केलं. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. दरम्यान, 300 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसंच घटनेच्या निषेधार्थ बुधवारी देखील बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. यामुळं शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. बदलापुरातील शाळा भाजपा नेत्यांशी संबंधित असल्याचं बोललं जातंय.
अकोला :बदलापुरातील अत्याचाराची घटना ताजी असताना आता अकोल्याच्या 6 शाळेतील मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतापजनक म्हणजे एका विकृत शिक्षकानं शाळकरी मुलींना अश्लील व्हिडीओ दाखवून त्यांचं लैंगिक शोषण केलं. विचित्र पद्धतीनं शिक्षक मुलींना स्पर्श करायचा, असा त्याच्यावर आरोप आहे. आरोपी शिक्षकावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
नाशिक :सिन्नर तालुक्यात फक्त साडेचार वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली. घरासमोर खेळत असताना आरोपीने तिचं अपहरण केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या. या प्रकरणी पोस्को अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आळंदी :काही महिन्यापूर्वी आळंदीत एका 12 वर्षीय मुलावर एकानं अनैसगिक लैंगिक अत्याचार केले होते. आरोपी हा अनाथ मुलांच्या निवासी संस्थेतील कर्मचारी होता. काही दिवसांनी त्या आरोपीला अटक केलीय. आरोपी हा मुलास मोबाईल पाहायला देऊन त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करत होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राजकीय आरोप-प्रत्यारोप :बदलापुरातील घटनेवरुन राजकारण होताना पाहायला मिळत आहे. या घटनेत राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळं घटना समोर येण्यास विलंब लागल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. बदलापुरात आंदोलकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्यावर लाठीचार्ज केल्याची घटनादेखील काल घडलीय. यात आंदोलकांची काय चूक?, असा प्रश्न उपस्थित होतोय. ती शाळा भाजपा नेत्याशी संबंधित असल्याची माहिती मिळतेय. म्हणून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. पण ही शाळा भाजपा सोडून अन्य राजकीय पक्षाची असती, तर भाजपाच्या लोकांनी मुख्यत: देवेंद्र फडणवीसांसह त्यांच्या महिला मंडळानी शाळेत ठिय्या मांडला असता, असं शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी घणाघात केला आहे. "ही शाळा भाजपा नेत्याची आहे. पीडित कुटुंबाचा गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांनी 12 तास लावले. पोलिसांवर दबाव होता. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला", असा आरोप माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्षाचे) नेते अनिल देशमुख यांनी केला आहे. "दुसरीकडं सरकार चांगलं काम करतेय म्हणून सरकारला गालबोट लावण्यासाठी आंदोलनात विरोधकांनी माणसं घुसवली. किमान याबाबत तरी विरोधकांनी राजकारण करू नये," असं सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी म्हटलंय.
बदलापूरच्या घटनेतत कारवाई करण्यास उशीर झाला, यावर राज ठाकरे यांनीदेखील नाराजी व्यक्त केली. त्यांनी एक्स मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले," यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली. विषय लावून धरल्यानंतर त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटलं. मुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही. आज सरकार 'लाडकी बहीण' योजनेच्याद्वारे स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न आहे. पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये. दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं, हे पहिलं कर्तव्य नाही का ? जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे. माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आलाय याचा मला अभिमान आहे. पण मुळात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे."
अशा घटना घडल्यानंतर या विरोधात आंदोलन केलं जातं. आरोपीला कठोर शिक्षेची विरोधकांकडून मागणी होते. पुढं आरोपीला दोन-चार वर्षाची शिक्षा होते. तो पुन्हा बाहेर येऊन मोकाट फिरतो. पण जेव्हा असं कृत्य केलं जातं. त्यावेळी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा किंवा फाशीची शिक्षेची तरतूद कायद्यामध्ये झाली पाहिजे. तरच असं कृत्य करण्यास आरोपीला धाडस होणार नाही- बदलापूर येथील रहिवाशी, आप्पा वाघमारे
कायद्याची जरब नाही :राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिला तसंच अल्पवयीन मुलींवर अत्याचार, बलात्कार, लैंगिक शोषणाच्या घटनेमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. त्यामुळं राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? असा संतप्त सवाल नागरिकांना पडला आहे. पोलिसांना वरिष्ठांचे आदेश आले, की त्यांनाही शांत बसावं लागतं. राजकीय हस्तक्षेपामुळं खाकी वर्दीला आपला दंडुका खाली घ्यावा लागतोय. यामुळं गुन्हेगार मोकाट सुटलेत. परिणामी अत्याचाराच्या घटनामध्ये वाढ होतेय, अशीही जनसामान्यांची भावना आहे. "राज्यात दिवसाढवळ्या मुलींची छेडछाड काढली जाते. महिला, शाळकरी मुलींवर अत्याचार, बलात्कार केले जाताहेत. पण अशा घटना रोखण्यास सरकार, गृहखातं अपयशी ठरलंय. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. कायद्याची वचक नसल्यामुळं, असे प्रकार घडताहेत. असं कृत्य केल्यानं थोडीफार शिक्षा होईल, असं आरोपींना माहितीय. परिणामी त्यांना कायद्याचा जरब, भीती नसल्यामुळं समाजात असा वारंवार घटना घडताहेत". अशी प्रतिक्रिया बदलापूरातील रहिवासी निशा माने यांनी भारत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.
'हे' वाचलंत का :
- बदलापूर अत्याचार प्रकरण ; नराधम अक्षय शिंदे याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, बदलापुरात तणावपूर्ण शांतता - Badlapur Minor Girl Sexual Assault
- बदलापूर शहर आजही बंद; पोलिसांनी 38 आरोपींना केलं अटक: तगडा बंदोबस्त तैनात, सुषमा अंधारे देणार भेट - Badlapur Protest
- बदलापूर पाठोपाठ मुंबईत आठ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार - Molestation