महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रकाश आंबेडकरांना अकोला लोकसभा मतदार संघात एमआयएमचा पाठिंबा; असदुद्दीन ओवैसींचा मनोज जरांगेंना 'हा' सल्ला - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी अकोला लोकसभा मतदार संघात पाठिंबा जाहीर केला आहे. या अगोदर एमआयएमनं यवतमाळ मतदार संघात आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी असदुद्दीन ओवेसी यांनी मनोज जरांगे यांनी पक्ष काढावा, असा सल्लाही दिला. असदुद्दीन ओवैसी हे छत्रपती संभाजीनगरमधील सभेत मंगळवारी बोलत होते.

Lok Sabha Election 2024
एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 17, 2024, 8:09 AM IST

Updated : Apr 17, 2024, 3:06 PM IST

छत्रपती संभाजीनगर Lok Sabha Election 2024 : यवतमाळ इथं आनंदराज आंबेडकर यांना एमआयएमनं पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर अकोला इथं प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी छत्रपती संभाजीनगरात मंगळवारी रात्री केली. "एका साध्या माणसानं नरेंद्र मोदी यांची झोप उडवली, एकनाथ शिंदे अडचणीत आले, उद्धव ठाकरे यांना पण कळत नाहीये काय करायचे, अशा मनोज जरांगे पाटील यांचं मी अभिनंदन करतो. मात्र त्यांनी राजकीय पक्ष तयार करावा," असा सल्ला असदुद्दीन ओवैसी यांनी शहागंज इथं झालेल्या जाहीर सभेत मनोज जरांगे यांना दिला. "देशात होणारे नवनवीन कायदे अल्पसंख्याक समाजासाठी धोक्याचे आहेत," असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा :एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी सोमवारी झालेल्या जाहीर सभेत यवतमाळ इथं आनंदराज आंबेडकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर मंगळवारी झालेल्या जाहीर सभेत त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला. "इम्तियाज जलील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आहेत, असं असलं तरी त्यांनी आज व्यासपीठावर अकोला इथं प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी उभं राहण्याची मागणी केली. ही मागणी नक्कीच पूर्ण करू, अकोला इथं प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी उभं राहण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. राज्यात मागासवर्गीय नेतृत्व पुढं आलं पाहिजे, यासाठी आम्ही हा निर्णय घेत आहोत," असं त्यांनी सांगितलं. "अकोला येथील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या पारड्यात आपली मतं टाकावी," असं आवाहन त्यांनी जाहीर सभेत केलं.

जरांगे पाटील यांनी पक्ष स्थापन करावा :एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ गेल्या तीन दिवसापासून ते जिल्ह्यातील विविध भागांमध्ये सभा घेत आहेत. शहागंज येथे झालेल्या सभेत त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या भूमिकेचं कौतुक केलं. "एका साध्या माणसानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झोप उडवली, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पोटात दुखलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणलं, तर उद्धव ठाकरे यांना काय करावं ते पण कळत नाही. इथं हुशारी नाही तर दाखवलेलं वेडंपण कामी आलं. त्यांनी आता राजकीय पक्ष काढून त्याचं नेतृत्व करावं. आपल्या समाजाला न्याय मिळवायचा असेल, तर त्यांनी मतदान घेऊन आपली ताकद उभी करावी," असे देखील असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितलं.

अल्पसंख्यांक समाजाच्या लग्न पद्धतीवर निर्बंध :"राज्यात दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, एक भाजपा आणि अर्धी काँग्रेस यांच्या विरोधात आपली लढाई आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा देशात वेगवेगळे कायदे लागू करत आहे. ज्याच्यामध्ये अल्पसंख्यांक समाजाला अडचणीत आणण्याचं काम केलं जात आहे. ट्रिपल तलाक सारखे कायदे लागू केले जात आहेत. अल्पसंख्यांक समाजाच्या लग्न पद्धतीवर निर्बंध आणण्याचं काम भाजपा करत आहे," असा आरोप त्यांनी केलाय. त्याचबरोबर "उद्धव ठाकरे यांना आता मशाल हे चिन्ह मिळालं, मशालीमध्ये आग असते जी आपल्याला पेटवू शकते. म्हणून त्यांच्या नादी लागू नका. त्यांना आता सर्वधर्म समभाव आठवत आहे," अशी टीका देखील असदुद्दीन ओवैसी यांनी जाहीर सभेत केली.

हेही वाचा :

  1. खासदार इम्तियाज जलील मुंबईमधून लोकसभा लढवण्यास इच्छुक, काय आहे कारण?
  2. Rahul Gandhi News: केसीआरसह एआयएमआयएम नेत्यांवर एकही खटला नाही, कारण... राहुल गांधींची पंतप्रधानांवर टीका
  3. MIM On Sambhaji Bhide : संभाजी भिडेंचा पाय कापणाऱ्यास दोन लाख; एमआयएम नेत्याकडून बक्षीस जाहीर
Last Updated : Apr 17, 2024, 3:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details