मुंबई MHADA fake website :महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाची (म्हाडा) बनावट वेबसाइट तयार करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपींनी पोर्टलद्वारे म्हाडाच्या अर्जदारांकडून पैसे स्वीकारल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दोघांना अटक केल्याची माहिती दिलीय. कल्पेश सेवक तसंच अमोल पटेल अशी अटक आरोपींची नावे आहेत. कल्पेशनं म्हाडाची बनावट वेबसाइट तयार केली होती. तर अमोल अधिकारी बनून नागरिकांना गंडा घालत होता.
दोघांना अटक : म्हाडाच्या 2024 च्या सदनिकाच्या सोडतीसाठी त्यांनी ही वेबसाईट तयार केल्याचं समोर आलं आहे. त्यांनी अर्जदारांकडून पैसे स्वीकारून नागरिकांची फसवणूक केल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पश्चिम विभाग सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सायबर पोलिसांच्या पथकानं गुन्ह्याचा तांत्रिक तपास करत आरोपी कल्पेश सेवक आणि अमोल पटेल यांना ताब्यात घेतलं. दोन्ही आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग समोर येताच त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.