मुंबई Mumbai Local Mega Block :गणपती उत्सव तोंडावर आला आहे. त्यामुळे चाकरमानी आपल्या लाडक्या बाप्पाच्या सजावटीची खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. अशातच मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेनं मेगाब्लॉकची घोषणा केली असून, रविवारी खरेदी करण्यासाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना याचा मोठा फटका बसणार. शनिवार, रविवार सुट्टीचे दिवस पकडून अनेक जण शॉपिंगचा प्लॅन करतात. त्यामुळे सध्या गणपती सजावटीसाठी मुंबईकर घराबाहेर पडताना दिसत आहेत. आता सुट्टीच्या दिवशी रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक असल्यानं मुंबईकरांनी घराबाहेर पडताना रेल्वेचं वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडावं.
असा असणार ब्लॉक :सुरुवातीला आपण मध्य रेल्वेच्या मेन लाईनबाबत माहिती घेऊ. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर रविवारी सकाळी 10 ते सायंकाळी 4 माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गिकेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं सकाळी 10:14 ते दुपारी 3:18 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून धीम्या लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. ब्लॉकमधील धीम्या लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांदरम्यान वळवण्यात येणार असल्यानं या गाड्या नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटं उशिरा पोहोचतील.
ब्लॉकपूर्वीची शेवटची गाडी टिटवाळा लोकल असणार. ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी 9:53 वाजता सुटेल. तर, ब्लॉकनंतर पहिली गाडी आसनगाव लोकल असेल. ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी 3:32 वाजता सुटेल. दुसरीकडे अप स्लो लाईनवर ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल आसनगाव लोकल असेल, जी ठाण्याहून सकाळी 10.27 वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल कल्याण - ठाणेहून दुपारी 04.03 वाजता सुटणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.