मुंबई - दुरुस्ती आणि देखभालीसाठी रविवारी पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वेच्या हार्बर मार्ग आणि मुख्य मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉकचा उपनगरीय रेल्वे वाहतुकीसह लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम होणार आहे. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशीदरम्यान विशेष लोकल धावतील, तर ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन मार्गावरदेखील ही सेवा उपलब्ध असेल. या कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल, असे रेल्वे प्रशासनाने म्हटलंय.
उपनगरीय रेल्वे वाहतुकीवर होणार :मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमार्गावर विद्याविहार ते ठाणे स्थानकांदरम्यान 5 व्या आणि 6 व्या मार्गावर सकाळी 8.00 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या कालावधीत अप मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे येथे अप फास्ट मार्गावर वळवण्यात येतील. एलटीटीकडे जाणाऱ्या गाड्या विद्याविहार स्थानकावरील सहाव्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे याचा परिणाम उपनगरीय रेल्वे वाहतुकीवर होणार असून लोकल गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने धावतील.
ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 10.01 ते दुपारी 03.20 वेळेत रद्द : तर हार्बर लाइनचा मेगा ब्लॉक पाहता पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11:05 ते दुपारी 04:05 पर्यंत ब्लॉक असेल. सकाळी 10:33 ते दुपारी 3:49 पर्यंत पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या दिशेने अप हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाच्या दिशेने सकाळी 9:45 ते दुपारी 3:12 पर्यंत डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, ट्रान्स हार्बर मार्गावर देखील मेगाब्लॉक घेण्यात आला असून, ठाण्याहून पनवेलच्या दिशेने जाणारी ट्रान्स हार्बर लाईन सेवा सकाळी 11.02 ते दुपारी 03.53 पर्यंत रद्द राहतील. त्याचप्रमाणे पनवेलहून ठाण्याच्या दिशेने सुटणाऱ्या ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 10.01 ते दुपारी 03.20 या वेळेत रद्द राहतील.
अप-डाऊन धीम्या मार्गावर पाच तासांचा जम्बो ब्लॉक : दुसरीकडे पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात आला असून, बोरिवली ते गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अप-डाऊन धीम्या मार्गावर पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत अप-डाऊन मार्गावरील सर्व धिम्या गाड्या गोरेगाव ते बोरिवलीदरम्यान जलद मार्गावर चालवल्या जातील. ब्लॉकमुळे काही अप आणि डाऊन उपनगरीय सेवा रद्द राहतील. काही लोकल फेऱ्या अंधेरी आणि बोरिवली, गोरेगाव स्थानकापर्यंत चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत बोरिवली स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. 1, 2, 3 आणि 4 या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर ट्रेनचे आगमन/निर्गमन होणार नाही.
मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेचा पाच तासांचा जम्बो मेगाब्लॉक - SUNDAY MEGA BLOCK
मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून, लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर परिणाम होणार आहे.
मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक (Source- ETV Bharat)
Published : Dec 15, 2024, 1:05 PM IST