छत्रपती संभाजीनगर : ४४ वे मराठवाडा साहित्य संमेलन वाळूज इथं १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलं आहे. पहिल्यांदाच संविधानावर ग्रंथ म्हणून चर्चासत्र आयोजित करण्यात आल्याची माहिती मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी दिली. "निवडणुकांमध्ये संविधानावर उलटसुलट चर्चा झाल्या त्यामुळं याविषयावर सर्वसामान्यांपर्यंत त्याचं मूळ सार पोहचवण्याची गरज असल्यानं हा विषय निवडला आहे." असल्याचं ठाले-पाटील यांनी स्पष्ट केलं.
संविधान विषयावर चर्चासत्र : "लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये संविधानावर राजकीय चर्चा झाल्या. वाद-विवाद देखील झाले, त्यामुळं त्या विषयावर साहित्यसंमेलनात चर्चा घडावी, त्यांचं सगळं आयाम सर्वसामान्यांपर्यंत पोहचलं पाहिजे या हेतूनं पहिल्यादिवशी त्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या विषयावर बोलण्यासाठी तज्ञ मंडळींना आमंत्रित करण्यात आलं असून त्यामध्ये साहित्यिक नसलेले मात्र, साहित्याचा अभ्यासक असलेले अॅड. राज कुलकर्णी यांचं प्रमुख मार्गदर्शन असणार आहे. त्यासोबत डॉ. प्रल्हाद लुलेकर, अॅड. सुषमा अंधारे, मुक्ता कदम, श्रीरंजन आवटे, राहूल कोळंबे यांचा सहभाग असणार आहे." अशी माहिती मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली. संविधान हा ग्रंथ असू शकतो, काही लोकांना आक्षेप असू शकतो, वाद देखील होऊ शकतात. मात्र, याबाबतच चर्चा घडवणं गरजेचं असल्यानं हा विषय निवडल्याचं त्यांनी सांगितलं.