पुणे Sharad Pwar On Maratha Reservation :मराठा आरक्षण प्रश्नाच्या संदर्भात आज काही लोकांनी शरद पवार यांच्या मोदीबाग येथील कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलं. याबाबत शरद पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, "महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण व्यवस्थित ठेवण्यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. दोन समाजात कटुता निर्माण होणार नाही, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. वेळीच काळजी घेतली नाही तर काय होईल, हे सांगता येणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की, मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी आणि त्यांना जे योग्य लोक वाटतील त्यांना बैठकीला बोलवावं. यात आमची भूमिका ही सहकार्याची राहील." असं मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुणे येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केलं.
आम्ही सहकार्य करू :पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडण्यासाठी बैठक बोलवावी. या बैठकीत जरांगे पाटील यांनाही बोलवण्यात यावं. तसंच ओबीसींचं नेतृत्व करणारे नेते छगन भुजबळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाही निमंत्रित करावं आणि या संयुक्त बैठकीतून आपण चर्चा करून मार्ग काढण्याची भूमिका घ्यावी. तुम्ही जेव्हा बैठक बोलवणार तेव्हा आम्ही हजर राहणार आहोत. या बैठकीत एक निर्णय घेऊ आणि एकवाक्यता येण्यासाठी आम्ही सहकार्य करू."
केंद्रानं आरक्षणाकडे लक्ष घालावं : मराठा आरक्षणाबाबत पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, "आरक्षणाबाबत एक अडचण येण्याची शक्यता आहे. ती म्हणजे 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही, असा निर्णय यापूर्वीच कोर्टानं दिलाय. त्यामुळं आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या वतीनं केंद्र सरकारकडे याबाबतची आग्रही भूमिका मांडली पाहिजे. तामिळनाडूतील 50 टक्क्यांवरील आरक्षण टिकलं होतं. मात्र पण त्यानंतर जे-जे निर्णय न्यायालयात गेले ते टिकले नाहीत. त्यामुळे हे धोरण बदललं गेलं पाहिजे आणि हे बदलण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे आहे. केंद्रानं यात लक्ष घालावं आम्ही विरोधी पक्ष म्हणून सहकार्य करायला तयार आहोत."