सुमित पंडित यांची प्रतिक्रिया (Reporter ETV Bharat) छत्रपती संभाजीनगरFree cutting And beard trimming : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी शासनानं अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यात काही सामाजिक संघटनांनी देखील खारीचा वाटा उचलला आहे. असाच एक प्रयत्न जटवाडा येथील माणुसकी 'सलून'कडून करण्यात आला आहे. ज्या नागरिकांनी मतदान केलं, अशा सर्व नागरिकांना एक दिवस मोफत दाढी कटिंग करून देण्याची त्यांनी योजना राबवली. त्यानुसार मंगळवारी दिवसभर बोटावरची शाई दाखवा अन् मोफत सेवा मिळवा, असा उपक्रम माणुसकी समूहाचे प्रमुख सुमित पंडित यांनी राबवला.
मोफत दाढी कटिंग :मतदान करणाऱ्या नागरिकांना जटवाडा येथील माणुसकी सलूनमध्ये मोफत दाढी-कटिंग, महिलांना मोफत केशरचना करून देण्याची योजना आखली होती. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सुमित पंडित यांनी नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी एक अनोखी योजना राबवली. गेल्या पंधरा दिवसांपासून दुकानात येणाऱ्या ग्राहकांना या योजनेची माहिती देण्यात आली होती. मतदानासाठी कर्तव्य बजावणाऱ्या ग्राहकांना सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत मोफत सेवा देण्यात आली. दुपारपर्यंत 19 मतदारांनी सेवेचा लाभ घेतल्याची माहिती माणुसकी गटाचे प्रमुख सुमित पंडित यांनी दिली.
मतदान जनजागृती :13 मे रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्हा म्हणजे औरंगाबाद मतदारसंघात मतदान पार पडलं. मतदानाची तारीख जाहीर झाल्यानंतर माणुसकी समूहानं अनोखा उपक्रम राबवणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यावरून त्यांनी मतदानाच्या तारखेच्या पंधरा दिवस आधीपासूनच जनजागृतीला सुरुवात केली. बोटाची शाई दाखवा आणि मोफत सेवा मिळवा, असं त्यांनी आपल्या ग्राहकांना सांगितलं. त्यावर अनेकांनी या योजनेचं कौतुक केलं, तर काही लोकांनी दाढी कटिंग नाही, केली तरी आम्ही मतदान करू, असं दुकान चालकाला सांगितलं. 13 मे रोजी मतदान पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी या योजनेचा दुपारपर्यंत 19 जणांनी लाभ घेतला. तर काही महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला. यावेळी महिला मतदारांचे विशेष आभार दुकानाच्या संचालिका पूजा पंडित यांनी मानले.
चार्लीसोबत सेल्फी काढण्याचा लाभ : माणुसकी समूह तसंच ज्युनिअर चार्ली संघटनेच्या वतीनं गेल्या पंधरा दिवसांपासून शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये मतदान जनजागृती करण्यात आली. यामध्ये चार्ली चॅप्लिनचा वेश घातलेले 13 सदस्य लोकांना चार्लीच्या अंदाजात मतदान करा, असं आवाहन करत होते. माणुसकी समूहानं मोफत दाढी कटिंग करण्याची योजना राबवत असताना, दुकानात येणाऱ्या प्रत्येक मतदात्याचा चार्ली सोबत सेल्फी हा अनोखा उपक्रम देखील राबवला. त्यामुळं चार्लीसोबत फोटो घेण्यासाठी अनेकांनी दुकानाजवळ गर्दी केली होती. यावेळी मतदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानण्यात आले.
हे वाचलंत का :
- मतदानासाठी 'त्यांनी' चक्क दुबईतून गाठलं संभाजीनगर, मतदान न करणाऱ्यांनी घ्यावा आदर्श - Lok Sabha Election 2024
- लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान सोनिया गांधी यांनी आचारसंहितेचा भंग केला; नीलम गोऱ्हे यांचा गंभीर आरोप - Lok Sabha Election 2024
- लोकसभा निवडणूक 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणशीतून दाखल केला नामांकन अर्ज - PM Narendra Modi Nomination