महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात; आजपासून पुन्हा उपोषण सुरू - मराठा आरक्षण अधिसूचना अंमलबजावणी

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी, यात कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून (10 फेब्रुवारी)पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केलीय. कुणबी नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र देण्यात यावेत. तसंच, 'सग्यासोयऱ्यां'च्या संदर्भात अधिक स्पष्टता आणावी अशी जरांगे पाटील यांची मागणी आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्वावर आणि त्यावरील होणाऱ्या कामकाजाबाबद मनोज जरांगे पाटील हे चौथ्यांदा उपोषणाला बसले आहेत.

Manoj Jarange Hunger Strike Today
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 10, 2024, 10:15 AM IST

जालना Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी 9 ऑगस्ट 2023 पासून मनोज जरांगे पाटील वारंवार उपोषण करत आहेत. पहिल्या टप्प्यात करण्यात आलेलं उपोषण 17 दिवस चाललं. त्यावेळी सरकारनं 40 दिवसांचा वेळ मागून घेतला होता. परंतु, दिलेल्या कालावधीत सरकारनं काहीही केलं नाही, असा आरोप करत जरांगे पाटील पुन्हा 25 ऑक्टोबरपासून उपोषणाला बसले होते. ते उपोषण आठ दिवस चाललं. त्यावेळी सरकारने दोन महिन्यांचा वेळ मागून घेतला होता.

अधिसूचनेची अंमलबजावणी करावी : यावेळी सरकारचे काही मंत्री, माजी न्या. एम. जी. गायकवाड, न्या. सुनील सुर्वे आदींच्या मध्यस्थीने उपोषण सुटलं. मात्र, या दोन महिन्यांतही सरकारनं मराठा आरक्षणासाठी काही केलं नाही. त्यानंतर मुंबईत आंदोलन करण्याची हाक देण्यात आली. लाखो मराठ्यांचे वादळ मुंबईच्या वेशीवर धडकल्यानंतर सरकारनं धावाधाव करून नोंदी मिळालेल्यांना तत्काळ प्रमाणपत्र देण्यासंबंधी अधिसूचना काढली. परंतु, सग्यासोयऱ्यांच्या बाबतीत असलेली संदिग्धता कायम ठेवली असल्याचं जरांगे यांचं म्हणणं आहे.

आंतरवाली सराटीत चौथे उपोषण : मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचं अधिवेशन बोलवून कायदा करावा, अशी जोरदार मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलीय. त्याच मागणीसाठी जरांगे पाटील आजपासून उपोषणाला बसले आहेत. जरांगे यांनी आपण 10 तारखेला नवीन अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी उपोषणाला बसणार असल्याचं आधीच जाहीर केलं होतं. त्यामुळे आज सकाळी 10 वाजल्यापासून मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहेत. विशेष म्हणजे उपोषणाला बसण्यापूर्वी मनोज जरांगे यांनी गोदा पट्ट्यातील आंदोलकांसोबत बैठक घेतली. आंतरवाली सराटीत त्यांचं हे चौथे उपोषण आहे.

कठोर उपोषण असणार : येत्या दोन दिवसांत विशेष अधिवेशन बोलावून सग्यासोयऱ्यांबाबत काढलेल्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करून अंमलबजावणी करावी. मागासवर्ग आयोगाने जो अहवाल दिलेला आहे, त्याबाबत विशेष अधिवेशनात कायदा पारित करून न्यायालयासमोर तो अहवाल सादर केला पाहिजे. मात्र, जोपर्यंत कायद्यात रूपांतर होत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिकाच जरांगे यांनी घेतली. राज्यातील मराठा समाजाचा पुन्हा एकदा घात होवू नये, त्यामुळंच पुन्हा उपोषण करणार असल्याचंही जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान, आजपासून सुरु होणारं आमरण उपोषण कठोर उपोषण असणार आहे, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय.

ABOUT THE AUTHOR

...view details