बीड : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं, यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अनेकवेळा उपोषण करून आंदोलन केलं. मात्र, त्यांच्या मागणीबाबत राज्य सरकारनं अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. दरम्यान दसऱ्यानिमित्त बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नगद नारायण गडावर जरांगे पाटील यांनी दसरा मेळावा घेतला. यावेळी दसरा मेळाव्यात बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला.
उलथापालथ करावी लागणार :मनोज जरांगे पाटील म्हणाले, "मी नारायणगडावर मर्यादा पाळणार आहे. आमच्या वाट्याला अन्याय आला आहे. अन्यायाविरोधात उठाव करावा लागणार. हा जनसमुदाय अन्यायाविरोधात आला आहे. कुणीही जहारगीदाराची औलाद आली तरी झुकायचं नाही. अन्याय होत असेल, तर स्वसंरक्षण करायला शिका. समाज वाचवा, लेकर वाचवा. समाजाची मान उंचावेल असं वागा.आपल्याला विनाकारण टार्गेट केलं जात आहे. मला तुमची मुलं अधिकारी झालेलं पाहायचंय. जर आपल्याला न्याय मिळाला नाही, तर आपल्याला यावेळीस उलथापालथ करावी लागणार. याशिवाय आपल्याकडे आता पर्याय नाही. आपल्या नाकावर टिचून जर कुठला निर्णय होणार असतील तर आपल्याला या समाजाच्या लेकरांसाठी आपल्याला लढावंच लागणार. आपल्याला आपला समुदाय आणि शेतकरी महत्वाचा आहे. मला तुमच्याकडून एकच वचन पाहिजे. राज्यातील जनतेवर अन्याय झाला आणि मी सांगितलं आपल्याला हेच करायचं तर तेच करा, हेचं वचन मला तुमच्याकडून हवंय."
नारायणगडावर संबोधित करताना मनोज जरांगे पाटील (Source- ETV Bharat Reporter) आमच्याबाबत एवढा द्वेष का-"पक्ष-पक्ष नेता करू नका. समाजाला कलंक लावू नका," असं मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलं. सरकारसह आरक्षणाला विरोध करणाऱ्यांविरोधात जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा दंड थोपटले आहेत. यावेळी जरांगे पाटील म्हणाले, "ओबीसींमध्ये आधीच भरपूर असल्यानं तुम्ही येऊ नका म्हणता. मग तुम्ही काल मोठ्या 17 जाती आरक्षणात घातल्या, आता तुमच्या आरक्षणाला धक्का लागला नाही का? आमच्याबाबत एवढा द्वेष का?" असा सवालही जरांगे पाटील यांनी यावेळी केला. एकजण म्हणाला महाविकास आघाडीकडून लिहून घ्या, मगच आरक्षण देतो. आता ओबीसीमध्ये 17 जाती घालताना तुम्ही महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं का? अशी विचारणा करत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. तुम्ही कितीही आंदोलन करा, कितीही कोटीच्या संख्येनं या, आम्ही तुमच्या छातीवर बसून निर्णय घेणार, तुम्हाला काय करायचं ते करून घ्या, असा इशाराच जरांगे पाटील यांनी दिला.
आचारसंहिता लागू होईपर्यंत संयम बाळगावा लागेल : हिंदू धर्मानं आपल्याला अन्यायाविरोधात लढायला शिकवलं. अन्याय होत असेल तर उठाव करायचा हे आपल्याला हिंदू धर्मानं शिकवलं. आपल्या मुलांना न्याय मिळावा यासाठी हा उठाव सुरु आहे. आम्ही मराठा आरक्षणाची मागणी करत आहोत. त्यासाठी आम्ही गेल्या 14 महिन्यांपासून आरक्षणासाठी झुंजत आहोत. आम्ही क्षत्रीय मराठे आहोत, कधीच गप्प बसणार नाही. तुमच्या सर्वांच्या मनात जे असेल ते मी करणार. मी जाता जाता एवढंच सांगतो. आचारसंहितेनंतर मी तुम्हाला आपली मुख्य भूमिका सांगेन. मात्र, आचारसंहिता लागू होईपर्यंत संयम बाळगावा लागेल. सरकारला सांगते की सुट्टी नाही. आचारसंहिता लागल्यानंतर तुम्ही सर्वांनी सर्वांनी माझं ऐकायचं. तुमच्या मनात जे आहे, ती ईच्छा पूर्ण करायची जबाबदारी माझी आहे. तुमचा अभिमान वाढवल्याशिवाय राहणार नाही, असं जरांगे पाटील म्हणाले.
हेही वाचा
- फडणवीस साहेब तुमचे राजकीय गणित मीच बिघडवणार, मनोज जरांगेंचा थेट इशारा - Jarange On Devendra Fadnavis
- "निवडणूक घेऊन पश्चाताप होईल...", जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा - Manoj Jarange Patil On Goverment