बीड Manoj Jarange Matori Village :मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या मातोरी गावात दोन गटात वाद झाल्यानं दगडफेकीची घटना घडली. डीजेवरून मराठा आणि ओबीसी यांच्यात तुफान राडा झाला. त्यात गावातील अनेक दुचाकी फोडल्याचं समोर आलं असून एका डीजेचं मोठं नुकसान झालेलं आहे. या घटनेमुळं गावात तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे. परंतु आता शांतता आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हा वाद मनोज जरांगे यांच्या गावातील आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
डीजेवरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती : गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास ही घडना घडली. बीडच्या शिरूर तालुक्यातील मातोरी गावातील बसस्टॅण्डवर जवळ ही दगडफेकीची घटना घडली. गावातील अनेक दुचाकी फोडल्याचं सांगितलं जात आहे. ओबीसी आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले लक्ष्मण हाके गुरुवारी भगवानगडावर जाणार होते. त्यामुळे या भागात विविध ठिकाणी कार्यक्रम होते. जागोजागी सभा देखील आयोजित करण्यात आलेल्या होत्या. हाके यांना पाडळशिंगी येथून घेण्यासाठी तिंतरवणी, माळेगाव, पारगाव या ठिकाणचे ग्रामस्थ पाडळशिंगीकडे निघालेले होते. त्यांनी सोबत आणलेल्या डीजेवर मातोरीत आल्यानंतर दोन गाणी वाजवली. काही लोकांनी याला विरोध केला. मातोरी ग्रामस्थांनी त्यांना डीजे घेऊन जाण्याची विनंती केली. मात्र, काही तरुणांचा वाद सुरू झाल्याने दगडफेकीला सुरू झाली. यात डीजेचं तसंच दुचाकींचं देखील नुकसान झालं. घटनेची माहिती मिळताच गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.