सातारा- डॉ . मनमोहन सिंग यांच्या काळात मनरेगा, माहिती अधिकार, खाद्यान्न सुरक्षा, भूमी अधिग्रहण, शिक्षण हक्क, यासारखे कायदे झाले. त्यामुळे हा दहा वर्षाचा कालखंड हा आधुनिक भारताचा सुवर्ण काळच म्हणावा लागेल, असं पंतप्रधान कार्यालयाचे माजी राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
जागतिक मंदीच्या काळात महत्त्वाची भूमिका- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले, "जागतिक मंदीच्या काळामध्ये डॉ. मनमोहन सिंग यांची पंतप्रधान म्हणून भूमिका अत्यंत महत्वाची होती. त्यांनी देशाला आर्थिक मंदीची झळ बसू दिली नव्हती. त्यांना राजकारण चांगल्या पद्धतीने समजत होते. परंतु ते राजकारणी नव्हते".
अर्थतज्ज्ञ असल्याचा नव्हता गर्व-पृथ्वीराज चव्हाणांनी शोकसंदेशात म्हटलंय की, " डॉ. मनमोहन सिंग यांच्या सोबत मी पंतप्रधान कार्यालयाचा मंत्री म्हणून 6 वर्षे काम केलं होतं. त्या काळात मी त्यांचा अत्यंत निकटवर्तीय होतो. ते उच्चशिक्षित आणि अर्थतज्ज्ञ होते. त्याचा त्यांना कधीही गर्व नव्हता. डॉ. मनमोहन सिंग यांना राजकारण चांगल्या पद्धतीने समजत होतं. राजकारणात असूनही ते राजकारणी नव्हते, असं त्यांना म्हटलं जायचं. कारण ते परंपरागत मंत्री, पंतप्रधानांसारखे नव्हते. त्यांच्याकडे प्रचंड नम्रता होती. हे मी अगदी जवळून पाहिलं आहे".
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणाऱ्या आर्थिक उदारीकरणाचे श्रेय हे डॉ.मनमोहन सिंग यांना जाते-माजी खासदार, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील