नाशिकSwine Flu At Nashik : जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढत असल्याने महानगरपालिका आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. स्वाइन फ्लू संशयित रुग्णांचा शोध घेतला जात आहे. खोकला, सर्दी, तापाची लक्षणे आढळल्यास तत्काळ रुग्णालयात उपचार घेण्याचं आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीनं करण्यात येत आहे. गेल्या वर्षी शहरात डेंग्यूने थैमान घातलं होतं; परंतु सद्यस्थितीत स्वाइन फ्लूच्या रूपाने शहरातील रहिवाशांमध्ये नवे संकट उभे राहिले आहे. शहरात गेल्या आठवड्याभरापासून तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे असून त्यामुळे तापाचे रुग्ण वाढत आहेत. दुसरीकडे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव होत असल्याने रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले आहेत. सिन्नर आणि मालेगाव येथील दोन्ही महिलांचा नाशिकच्या खासगी रुग्णालयात मृत्यू झालाय. या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
लक्षणे आढळल्यास रुग्णालयाशी संपर्क साधावा :सिन्नर तालुक्यातील दातलीच्या महिले पाठोपाठ मालेगावच्या महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला; रुग्णांना काही लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता रुग्णालयात संपर्क साधावा, हलका आहार घ्यावा, जास्त थंड पाणी पिऊ नये, घसा खवखवत असल्यास तातडीने आरोग्य केंद्रात जावे असं आवाहन महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी केलंय.