मुंबई Assembly Election 2024 : लवकरच राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीला सामोरं कसं जायचं? आणि आपले आमदार जास्तीत जास्त कसे निवडून आणायचे? यासाठी सध्या राजकीय पक्षांकडून रणनीती आखली जात आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवारांची चाचपणी, जागावाटप, मोर्चेबांधणी, संघटनात्मक बांधणी आदींवर भर देण्यात येतोय. तर दुसरीकडं महायुतीनंही निवडणुकीसाठी कंबर कसलीय. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुती सरकार असून देखील महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळं विधानसभेला याची पुनरावृत्ती घडू नये, यासाठी राज्यातील महायुती सरकारकडून मतदारांना आपल्याकडं वळवण्यासाठी गेल्या महिन्याभरात अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. तसंच विविध माध्यमातून मदतीची घोषणाही सरकारकडून केली जात असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं महायुती सरकारनं पराभवाची धास्ती घेतली का? लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही आपणाला यश मिळणार नाही याची महायुतीला भीती वाटतेय का? असे अनेक प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात उपस्थित केले जात आहेत. गेल्या महिन्याभरात सरकारकडून कोणत्या योजना जाहीर करण्यात आल्या आणि त्यासाठी किती कोटींची तरतूद करण्यात आली ते पाहूया.
शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ता ज्योती वाघमारे यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter) महिन्याभरात सरकारनं कोणत्या योजना आणल्या?
मुख्यमंत्री लाडकी बहीण
- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (लाडका भाऊ)
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना
- शेतकरी वीज बिल माफ
- पिंक ई-रिक्षा योजना
- जल जीवन मिशन
योजनांसाठी किती कोटींची तरतूद?
मुख्यमंत्री लाडकी बहीण - 46 हजार कोटींची तरतूद (आत्तापर्यंत 25 हजार कोटी मंजूर)
- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना - 5 हजार 500 कोटींची तरतूद
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना - 52 लाखांहून अधिक कुटुंबांना दरवर्षी तीन गॅस सिलिंडर मोफत
- शेतकरी वीज बिल माफ - 14,761 कोटी रुपयांची तरतूद
- पिंक ई-रिक्षा योजना - 80 कोटींची तरतूद
... ही तर विकासाची वाट : महायुती सरकार राज्यात आल्यापासून अनेक समाजोपयोगी, कल्याणकारी योजना आणल्या आहेत. महिलांसाठी एसटी प्रवासात हाफ तिकीट असेल, 75 वर्षांवरील वृद्धांना मोफत प्रवास असेल किंवा आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल. लोकसभेत आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही, म्हणून विधानसभेतही आम्हाला यश मिळणार नाही. याची आम्हाला भीती नाहीतर ही आमची विकासाची नीति आहे, असं शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ता ज्योती वाघमारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना म्हटलं. तसंच यासर्व योजना पाहून विरोधकांच्या पोटात दुखतंय. या योजनांना राज्यभरातून उदंड प्रतिसाद मिळतोय. हे बघून विरोधकांना वाईट वाटू लागलंय, म्हणून ते काहीही आरोप करताय, असंही वाघमारे म्हणाल्या.
...म्हणून बहीण झाली लाडकी : दुसरीकडं यामुद्द्यावरुन विरोधक सरकारचा चांगलाच समाचार घेत असल्याचं बघायला मिळतय. याच पार्श्वभूमीवर "महायुतीला मतांची लागली कडकी, म्हणून आता बहीण झाली लाडकी" अशी बोचरी टीका शिवसेना ठाकरे गट उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलीय. तसंच लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. अगदी दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत त्यांनी सर्व यंत्रणा कामाला लावली. परंतु, त्यांना अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळंच ते आता मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनांची घोषणा करताय. परंतु महाराष्ट्रातील मतदार सुज्ञ आहे. त्याला सर्वकाही समजतं, असंही सुषमा अंधारे 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधत असताना म्हणाल्या.
योजनांचे मुद्दे प्रचारात : लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात 18 पेक्षा अधिक सभा घेऊनही महायुतीला 17 जागांवरच समाधान मानावं लागलं. तर महाविकास आघाडीला अनपेक्षितरित्या चांगलं यश मिळालं. यावरुन महाविकास आघाडी लोकसभा निवडणूक प्रचारात फेक नेरिटिव्हचा प्रचार करण्यात यशस्वी झाल्याचा आरोप महायुतीतील नेत्यांनी केला. तसंच लोकसभा निवडणुकीत जे झालं ते विधानसभेच्या निवडणूक प्रचारात होऊ देणार नाही, असंही महायुतीतील नेते म्हणताय. त्यामुळं आता विधानसभा निवडणूक प्रचारात कोणते मुद्दे असणार? याची सर्वांना उत्सुकता लागलीय.
हेही वाचा -
- विधानसभेची 'मत'पेरणी! 'लाडकी बहीण' आणि 'लाडका भाऊ'नंतर आता बळीराजासाठी आणली 'ही' योजना - CM Baliraja Free Power Scheme
- विधानसभेची 'मत'पेरणी? राज्य सरकारकडून पायी वारी करणाऱ्यांना मिळणार पेन्शन, सर्वधर्मीय ज्येष्ठांसाठी मोफत तीर्थयात्रा! - Maharashtra Government schemes News