मुंबई Vidhansabha Election 2024 :राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर असताना महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार? यावर सर्वच पक्षातील नेते आपापली प्रतिक्रिया देत आहेत. महायुतीत अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडणुकीनंतर ठरवला जाईल, असं सांगितल्यानं आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार की नाही? याबाबतही शंका निर्माण झालीय.
काँग्रेसकडून अनेक चेहरे शर्यतीत परंतु निर्णय हायकमांड घेणार :राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचं लक्ष विधानसभा निवडणुकीकडे लागलेलं असताना मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून अद्याप संभ्रम कायम आहे. आपल्याच पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा, असं प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतं. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळालं. काँग्रेस पक्ष 13 खासदारांसह राज्यातील सर्वात मोठा पक्ष असल्यानं मुख्यमंत्री आपल्याचं पक्षाचा होणार असा काँग्रेसकडून दावा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे. ज्या पक्षाचे आमदार असतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री, असा फॉर्म्युला साधारणपणे ठरवला जातो. पण हा फॉर्म्युला धोकादायक असल्याचं उद्धव ठाकरेंनी यापूर्वीच म्हटलं आहे. मुख्यमंत्री पदासाठी शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण हे निवडणाऱ्या नावाला माझा पूर्ण पाठिंबा असेल, असं सांगून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसलाही चक्रावून टाकलंय. महाविकास आघाडीकडं सध्या उद्धव ठाकरे हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून मुख्यमंत्री पदासाठी चेहरा आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत आत्मविश्वास दुणावलेल्या काँग्रेसला पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार हे मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत. मात्र हा निर्णय संपूर्णपणे दिल्ली हायकमांड घेईल. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.
भाजपाकडून देवेंद्र फडवणीस हेच मुख्यमंत्री : महायुतीत सर्वात मोठा पक्ष भाजपा असल्यानं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर भाजपा नेते ठाम आहेत. राज्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकार बनवताना स्वतःच्या पक्षाचे जास्त आमदार असतानाही मुख्यमंत्री पदाची माळ भाजपनं एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात टाकली. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. महायुतीत विधानसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्मुला अद्याप ठरला नाही आहे. परंतु, ही निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवली जाईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे भाजप 150 जागा लढण्याच्या तयारीत असून मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडवणीस यांच्या नावावरच शिक्कामोर्तब केलं गेलं आहे. भाजपाचे नेते तथा कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी राज्यातील सरकारी योजना पुढे सुरू ठेवायच्या असतील तर देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करा, असं उघडपणे म्हटलं आहे.