नाशिकBabanrao Gholap resigned :शिवसेनेचे ठाकरे गटाचे माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्मकार समाजाच्या पदाधिकाऱ्यांसमोर विविध मागण्या मांडल्या होत्या. त्यातील 90 टक्के मागण्या मान्य झाल्याचं घोलप यांनी सांगितलं होतं. घोलप तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळं वेगळीच चर्चा सुरू होती. अखेर आज बबनराव घोलप यांनी शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
दोन दिवसांत पुढील निर्णय जाहीर करणार : बबनराव घोलप यांच्याकडं शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं संपर्क मंत्री पद होतं. मात्र, संपर्क मंत्री पद काढून घेतल्यापासून घोलप ठाकरे गटावर नाराज होते. त्यामुळं त्यांनी राजकीय वातावरण पाहून ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, राजीनामा स्वीकारण्यात आलेला नव्हता. त्यानंतर संजय राऊत यांची भेट घेऊन त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या होत्या. मात्र, प्रत्यक्ष बोलणं झाल्यानंतरही कोणतीही हालचाल न झाल्यानं चर्मकार समाजानं एकत्रित येत, मुंबईत निदर्शनंदेखील केली होती. या सर्व प्रक्रियेत ठाकरे गटानं कोणतीही दखल न घेतल्यामुळं व्यथित झालेल्या माजी मंत्री घोलप यांनी आज अखेर राजीनामा देण्याचं शस्त्र उगारलं. एक-दोन दिवसात ते पुढील निर्णय जाहीर करणार आहेत. त्यामुळं बबनराव घोलप लवकरच शिंदे गटात सामील होणार, अशी चर्चा आहे.
- सभेला अनुपस्थित :ठाकरे गटाकनं घोलप यांची कोणतीही दखल न घेतल्यानं गेल्या महिन्यात नाशिक येथे झालेल्या ठाकरे गटाच्या अधिवेशनालाही ते अनुपस्थित होते. तसंच ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.