महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उगवत्याला नमस्कार! महाविकास आघाडीचे ५ ते ६ आमदार महायुतीत सामील होणार? - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविलेल्या महायुतीचं विधानसभेतील बलाबल आणखी वाढण्याची शक्यता आहे. महायुतीच्या दाव्यानुसार महाविकास आघाडीचे आमदार त्यांच्या संपर्कात आहेत.

Maharashtra new gov formation
प्रतिकात्मक- महायुती सरकार स्थापना (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 25, 2024, 10:10 AM IST

मुंबई: महायुतीला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महाविकास आघाडीला आणखी धक्के बसण्याची चिन्हे आहेत. एकीकडं अपक्ष आमदारांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. दुसरीकडं शिवसेना (उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे (एसपी) आमदार महायुतीच्या संपर्कात असल्याचा दावा सत्ताधारी नेत्यांकडून करण्यात आला आहे.

महायुतीला 230 जागांवर विजय मिळाल्यानं सत्तास्थापनेकरिता अपक्षांची गरज भासणार नाही. तसेच आमदारांची फोडाफोड होण्याची स्थिती नाही. असे असले तरी पुन्हा एकदा शिवसेना (यूबीटी) आणि राष्ट्रवादी (एसपी) या पक्षांना गळती लागण्याची चिन्हे आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Source- ETV Bharat Reporter)

आमच्या संपर्कात उबाठा गटाचे काही आमदार आहेत. पुढील आठ-दहा दिवसात काय करायचे ते आम्ही ठरवू- शिवसेनाआमदार, भरतशेठ गोगावले

  • "राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटातील) काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. भविष्यात ते आमच्याकडे येऊ शकतात, "असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद अनिल पाटील यांनी केला आहे. "महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे. येत्या चार महिन्यांमध्ये पाच ते सहा आमदार महायुतीमध्ये सामील होऊ शकतात," असे आमदार पाटील यांनी सांगितलं.

    शिवसेनेला 4 अपक्ष आमदारांचे समर्थन-अपक्ष आणि इतर लहान पक्षांना 12 जागांवर विजय मिळाला आहे. या 12 मधील चार आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.

पराभवानंतर महाविकास आघाडीचे नेते धक्क्यात-विधानसभा निवडणुकीत पानीपत झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढं राजकीय पेच निर्माण झाले आहेत. विरोधी पक्षनेत पदासाठी लागणारी 29 एवढी आमदार संख्यादेखील कोणत्याच पक्षाकडं नाही. दुसरीकडं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात अशा बड्या नेत्यांचादेखील विधानसभा निवडणुकीत पराभव झाला.

पृथ्वीराज चव्हाण- शरद पवार यांच्यात चर्चात-सातारा जिल्ह्यातील कराड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर ही महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत महाविकास आघाडीच्या पराभवाच्या कारणांवर चर्चा करण्यात आली. "विरोधी पक्षनेते निवडीसाठी विरोधकांकडे पुरेशी संख्या नाही. त्यामुळे त्यांनी विधीमंडळाबाहेर जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत," असे माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. पक्षाचे नेते आणि नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेण्याची त्यांनी गरज व्यक्त केली.

हेही वाचा-

  1. "काँग्रेस नेत्यांनी अपक्ष बंडखोर उमेदवारास रसद पुरविली, युती नकोच", ठाकरेंच्या उमेदवाराचा गंभीर आरोप
  2. भाई, भाऊ की दादा? मुख्यमंत्रिपदाचा निर्णय दिल्ली दरबारी, 'स्टाइक रेट'मुळं राष्ट्रवादी आग्रही
  3. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याविना चालणार सभागृह? जाणून घ्या कारण...

ABOUT THE AUTHOR

...view details