भांडुप मतदारसंघात कोण होणार विजयी? ठाकरे गट गड राखणार की फुटीचा फटका बसणार? - MAHARASHTRA ELECTION 2024
भांडुप मतदारसंघात आता दोन शिवसेनेत लढत होणार आहे. शिवसेना (ठाकरे) गटाचे उमेदवार रमेश कोरगावकर आणि शिंदेंच्या सेनेचे अशोक पाटील यांच्यात मुख्य मुकाबला होईल.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे (ETV Bharat File Photo)
मुंबई -विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीचं चित्र आता स्पष्ट झालंय. सोमवारी (4 नोव्हेंबर) अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. ज्यांना तिकीट मिळाले नाही किंवा पक्षाने उमेदवारी दिली नाही, अशा बंडखोरांनी मोठ्या प्रमाणात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामुळं महायुती आणि महाविकास आघाडीला बंडाला सामोरी जाऊ लागलीय. मात्र सोमवारी अनेक बंडोबांना थंडोबा करण्यात पक्षश्रेष्ठींना यश आलं असून, अनेक बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलेत. त्यामुळं आता राज्यभरातील 288 जागावर कोण कुणाविरोधात लढणार आहे, याचे चित्र स्पष्ट झालंय. दरम्यान, मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये आता महायुती आणि महाविकास आघाडी, मनसे, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष उमेदवार हे एकमेकांसमोर उभे ठाकलेत. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिलाय. या मतदारसंघात आता दोन शिवसेनेत लढत होणार आहे. शिवसेना (ठाकरे) गटाचे उमेदवार रमेश कोरगावकर आणि शिंदेंच्या सेनेचे अशोक पाटील यांच्यात मुख्य लढत होणार आहे. इथे मतदारांच्या काय समस्या आहेत? मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्यात लोकप्रतिनिधींना यश आलंय का? तसेच या मतदारसंघाचा इतिहास काय आहे? याचा आपण आज आढावा घेणार आहोत.
मतदारसंघाचा इतिहास काय?:भांडुप विधानसभा मतदारसंघ हा मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघातील एक विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात मुंबईचे मिनी कोकण म्हणून भांडुपकडे पाहिले जाते, तसेच मुंबईतील कोकणी माणसाचा मतदार संघ असे भांडुप मतदारसंघाची ओळख आहे. या मतदारसंघाचा इतिहास किंवा पार्श्वभूमी पाहिली तर भांडुप विधानसभा मतदारसंघाची 1978 मध्ये स्थापना झाली. पहिल्याच वर्षी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने इथे बाजी मारली. त्यानंतर 1980 आणि 85 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. काँग्रेसने आपली ताकद वाढवत येथे आपले आमदार निवडून आणले. त्यानंतर 1990 ते 2000 या काळात शिवसेनेने आपले वर्चस्व प्रस्थापित केलंय. शिवसेनेने येथे ताकद वाढवली, यानंतर 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार निवडून आला. त्यानंतर 2009 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिशिर शिंदे हे मोठ्या मतांच्या फरकाने विजयी झाले होते. यानंतर 2014 आणि 2019 मध्ये दोन्ही वेळा शिवसेनेने गड राखला आहे. सध्या इथे शिवसेना (ठाकरे गटाचे) रमेश कोरगावकर हे लोकप्रतिनिधी म्हणून आहेत. परंतु आता इथे महायुती, महाविकास आघाडी, अपक्ष तसेच मनसे यांच्यात लढत होणार आहे.
मतदारसंघातील काय आहेत समस्या?:भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघ संमिश्र लोकवस्तींचा मतदारसंघ म्हणून पाहिला जातो. येथे कष्टकरी, मजूर, मध्यमवर्गीय समाजातील लोक राहतात. इथे मतदारांच्या आणि रहिवाशांच्या अनेक समस्या आहेत. पायाभूत सुविधांपासून हा मतदारसंघ वंचित राहिलाय. पिण्याच्या पाण्याची समस्या, वाहतूक कोंडी, मल:निसारणाची व्यवस्था हे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे भांडुप रेल्वे स्थानक नेहमी प्रवाशांनी गजबजलेलं असतं. त्यामुळं येथे रेल्वेची तसेच रेल्वे गाड्यांची मोठी समस्या आहे. रेल्वे प्रवासी भांडुप रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर रस्त्यावर त्यांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. अरुंद असलेले रस्ते, शासकीय रुग्णालयाचा अभाव, मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण, नाट्यगृह आदींचा अभाव मतदारसंघात आहे. तसेच भांडुप पश्चिमेतील झोपडपट्टी पुनर्वसन, अनेक असलेल्या झोपडपट्टी यांच्यातील मूलभूत प्रश्न सोडविले गेले नाहीत. याव्यतिरिक्त भांडुपमध्ये मराठी, गुजराती, मुस्लिम, दक्षिणात्य आणि उत्तर भारतीय या समाजातील लोक मोठ्या प्रमाणात राहतात. या मतदारसंघात सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडीही घडतात. परंतु या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून पायाभूत सुविधांचा अभाव पाहायला मिळत आहे.
दोन शिवसेनेत मुख्य लढत: सध्या रमेश कोरगावकर हे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत. त्यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलीय. तर 2014 साली अशोक पाटील हे आमदार म्हणून निवडून आले होते. अशोक पाटील हे सध्या शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. त्यामुळं शिंदे गटाकडून अशोक पाटील यांना उमेदवारी देण्यात आलीय. तसेच ठाकरे गटाकडून रमेश कोरगावकर यांना उमेदवारी देण्यात आलीय. यामुळं दोन शिवसेनेतच मुख्य लढत होणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत आहे. परिणामी शिवसेनेतील मतांचे विभाजन होणार आहे. अशोक पाटील हे शिवसेना (शिंदे गट), भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) असं महायुतीचे उमेदवार आहेत. तर रमेश कोरगावकर हे शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यामुळे इथे काटे की टक्कर होणार असल्याचं बोललं जातंय. पक्षीय बलाबल पाहता मागील दोन विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे आमदार असल्यामुळं शिवसेनेची ताकद बऱ्यापैकी आहे. परंतु आता शिवसेनेत फूट पडल्यामुळं स्वाभाविकपणे मतांचे विभाजन झालंय. या मताचा फटका कोणाला बसतो आणि फायदा कोणाला होतो? याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. मतदारसंघातील मतांचा विचार केल्यास येथे तीन लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत. यामध्ये एक लाख 70 हजारांच्यावर पुरुषांचे मतदान आहे, तर एक लाख 35 हजारांच्या वर महिला मतदार आहेत. परंतु येत्या निवडणुकीत मतदार आपले बहुमूल्य मत कोणाच्या पारड्यात टाकतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.