मुंबई -विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेले अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस सोमवारी (4 नोव्हेंबर) रोजी संपुष्टात आलाय. यानंतर आता कोण कुठून लढणार, याचे चित्र स्पष्ट झालंय. दरम्यान, काही बंडखोर निवडणुकीवरती ठाम असल्यामुळं महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेत्यांची डोकेदुखी वाढलीय. दुसरीकडे मंगळवारपासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झालीय. प्रचारात सत्ताधारी-विरोधक आरोप-प्रत्यारोपांची फैरी झाडताहेत. यामुळं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगतोय. महत्त्वाचे म्हणजे मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघ हा मागील काही दिवसांपासून अनेक कारणामुळं चर्चेत असून, इथे तिरंगी लढत होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक लढवताहेत. महायुतीकडून शिवसेना (शिंदे गटाचे) सदा सरवणकर हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून उबाठाचे महेश सावंत हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे इथे कोण बाजी मारणार? याकडे मुंबईसह महाराष्ट्राचे लक्ष लागलंय. खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी "ईटीव्ही भारत"ला एक्सक्लुसिव्ह मुलाखत दिलीय. या मुलाखतीत त्यांनी आपण निवडून आल्यानंतर कोणती कामं करणार? याबाबत सविस्तर माहिती दिलीय.
उद्धव साहेबांचा विश्वास सार्थ ठरवणार :महेश सावंत यांनी "ईटीव्ही भारत"ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले की, माहीम विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथे बाजूलाच शिवसेना भवन असून, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मागील लोकप्रतिनिधींनी कोणतीही कामं केलेली नाहीत. इथे जरी दोन दिग्गज उमेदवार असले तरी आपणच विजयी होणार, असा विश्वास यावेळी महेश सावंत यांनी व्यक्त केलाय. एक साधा शिवसैनिक अन् शाखाप्रमुखाला उद्धव साहेबांनी विधानसभा निवडणुकीची उमेदवारी दिलीय. दुसरीकडे जरी ठाकरे घराण्यातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात असला तरी माझ्यावर कोणताही दबाव नाही. उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन इथे उमेदवार दिलेला आहे. विधानसभा निवडणूक असल्यामुळे आम्ही पूर्ण तयारीशी निवडणुकीत उतरणार आहोत. आमच्या कार्यकर्त्यांनी येथे जोर लावलाय. माझ्यावर उद्धव साहेबांचा आशीर्वाद आहे. शिवसैनिकांचा उत्साह आहे. त्यामुळं आपणच निवडून येणार आणि उद्धव साहेबांचा विश्वास सार्थ ठरवणार, असंही यावेळी महेश सावंत यांनी सांगितलं.