मुंबई-समाजवादी पक्ष महाविकास आघाडीत आहे की नाही याबाबत अद्याप संदिग्धता कायम आहे. समाजवादी पक्षाने महाविकास आघाडीकडे पाच जागांची मागणी केली होती. मात्र शेवटपर्यंत महाविकास आघाडीने त्यांना पाच जागा सोडण्यास नकार दिलाय. त्यामुळे समाजवादी पक्षाने राज्यात नऊ जागांवर त्यांचे उमेदवार उभे केलेत. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षांच्या चार उमेदवारांची घोषणा केलीय.
मविआचे छोट्या पक्षांकडे दुर्लक्ष :लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत समाजवादी पक्षाने इंडिया आघाडीला मनापासून पाठिंबा दिला होता. राज्यात एकही जागा न लढवता समाजवादी पक्षाने काँग्रेसचा आणि इंडिया आघाडीचा प्रचार केला होता. राज्यातील मुस्लिमबहुल भागामध्ये त्याचा इंडिया आघाडीला चांगला लाभ झाला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून चांगली वागणूक मिळेल, अशी अपेक्षा समाजवादी पक्षाला होती. परंतु महाविकास आघाडीने त्यांचा अपेक्षाभंग केलाय. विधानसभा निवडणुकीत अद्याप समाजवादी पक्षासोबत आघाडी झालेली नसल्याने समाजवादी पक्षाच्या नाराजीचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची भीती आहे. लोकसभेतील विजयामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावल्यामुळे त्यांनी समाजवादी पक्ष आणि इतर छोट्या-मोठ्या पक्षाकडे जागावाटपात दुर्लक्ष केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
समाजवादीमध्ये नाराजीचे वातावरण:2019 च्या निवडणुकीत समाजवादी पक्षातर्फे मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून अबू आझमी आणि भिवंडी पूर्व मतदारसंघातून रईस शेख या दोघांनी विजय मिळवत विधिमंडळात प्रवेश केला होता. राज्याच्या अल्पसंख्याकबहुल काही भागात अबू आझमी यांचा प्रभाव आहे. अबू आझमींचे नऊ उमेदवार रिंगणात राहिले तर त्याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे. मात्र महाविकास आघाडीकडून समाजवादीला पुरेसा सन्मान आणि जागा वाटपात योग्य संधी मिळाली नसल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचे वातावरण आहे.
आझमींना मानणारा मुस्लिम समाजात मोठा वर्ग :अबू आसीम आझमी यांना अल्पसंख्याक मुस्लिम समाजात मानणारा मोठा वर्ग आहे. अल्पसंख्याकांचे विविध प्रश्न सातत्याने आझमी विधानसभेत मांडत असतात. मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी ते नेहमी आवाज उठवतात. इतर पक्षातील मुस्लिम नेत्यांच्या तुलनेत अबू आझमी हे अधिक आक्रमकपणे अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचे प्रश्न मांडतात. त्यामुळे त्यांची मुस्लिम समाजात एक वेगळी प्रतिमा आहे. आता त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी अर्ज भरल्याने मुस्लिम समाजाची मते विभागली जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.