मुंबई - मतदानाचा दिवस आता जवळ येतोय. अशातच सर्वच राजकीय पक्ष आपला निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध करीत असून, आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपला निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथून जाहीरनाम्यातील प्रमुख बाबी स्पष्ट केल्यात. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अभिनेते सयाजी शिंदे आणि रुपाली चाकणकर यांनी जाहीरनाम्यातील अन्य गोष्टी सांगितल्यात. सध्या महायुती सरकार लाडकी बहीण योजनेचं जोरदार ब्रँडिंग करताना दिसत असून, याचा प्रभाव राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात देखील पाहायला मिळतोय. जाहीरनाम्यात अजित पवार गटाने पहिलाच मुद्दा हा लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत उपस्थित केलाय.
सत्ता स्थापनेच्या 100 दिवसांत नवीन महाराष्ट्र व्हिजन :जाहीरनाम्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पुढील पाच वर्षांत काय काम करणार हे जाहीर केलं असून, यात महिला, युवक, शेतकरी हे सर्व मुद्दे घेण्याचा पक्षाने प्रयत्न केलेला दिसून येतो. जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दा हा लाडकी बहीण योजनेचा असून, सत्तेत आल्यास या योजनेचा हप्ता वाढवणार असल्याचं राष्ट्रवादीने म्हटलंय. सोबतच सत्ता स्थापन केल्यानंतर पहिल्या 100 दिवसांत नवीन महाराष्ट्र व्हिजनदेखील जाहीर करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसनं सांगितलंय.
600 रुपयांची वाढ केली जाणार : खरं तर जाहीरनाम्यात अजित पवारांनी लाडक्या बहीण योजनेचा हप्ता 1 हजार 500 रुपये प्रति महिन्यावरून 2 हजार 100 रुपये प्रति महिना करणार असल्याचे म्हटलंय. म्हणजे साधारण 600 रुपयांची वाढ केली जाणार आहे. याची एकूण बेरीज केल्यास साधारण 25 हजार रुपये वर्षाकाठी महिलांना मिळतील. सोबतच भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर 25 हजार रुपये बोनस, शेतकरी कर्जमाफी आणि साधारण दोन पूर्णांक पाच दशलक्ष रोजगार निर्मिती करणार असल्याचे राष्ट्रवादीनं सांगितलंय. विशेष म्हणजे 45,000 पाणंद रस्त्यांचे बांधकाम करण्यात येणार असल्याचे आश्वासनदेखील या घोषणापत्रात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून देण्यात आलंय. अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात वाढ करून कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपये प्रति महिना वेतन दिले जाणार आहे, असं आश्वासन अजित पवारांनी दिलंय.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे घोषणापत्र प्रसिद्ध, 'लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवणार;' अजित पवारांचं आश्वासन - MAHARASHTRA ELECTION 2024
महायुती सरकार लाडकी बहीण योजनेचं जोरदार ब्रँडिंग करताना दिसत असून, याचा प्रभाव राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात देखील पाहायला मिळतोय.
राष्ट्रवादीचा जाहीरनामा (ETV Bharat File Photo)
Published : Nov 6, 2024, 4:30 PM IST