नाशिकःबहुमताने राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षकडून छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलंनाही. छगन भुजबळ हे ओबीसींचे मोठे नेते आहेत, त्यांना मंत्रिमंडळात न घेतल्याने त्यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत. काही समर्थकांनी आता भाजपासोबत चला, असे जाहीरपणे आवाहन केलंय, कार्यकर्त्यांच्या आवाहनाला छगन भुजबळ कसा प्रतिसाद देतात, याचीच चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
नेत्यांशी बोलून पुढील राजकीय वाटचाल ठरवणार :"मैं उस पुराने जमाने का सिक्का हु, मुझे फेंक ना देना", अशा प्रकारे शेरोशायरी करत छगन भुजबळांनी समता परिषदेच्या मेळाव्यात 40 मिनिटे धडाकेबाज भाषण केलंय, यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांना लक्ष केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचा माझा मंत्रिमंडळात समावेश असावा, असा आग्रह होता. मात्र आमच्या नेत्याने ऐकलं नाही, असं त्यांनी म्हटलंय. या बैठकीला राज्याच्या विविध भागातून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी आले होते. यावेळी काही समर्थकांनी आता भाजपासोबत चला, असे जाहीरपणे आवाहन केलंय, तर काहींनी नवीन पक्ष काढण्याच्या मनोदय व्यक्त केलाय, मात्र तूर्तास सध्या कुठेही जायचे नाही. राज्यभरातील समता परिषदेचे पदाधिकारी आणि नेत्यांशी बोलून पुढील राजकीय वाटचाल ठरवणार असल्याचे संकेत छगन भुजबळ यांनी दिलेत.
...तर भुजबळांचा भाजपाला फायदा होऊ शकतो :मराठा आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टोकाची टीका केली होती, तेव्हा भाजपाच्या इतर कोणत्याही नेत्यापेक्षा जरांगेंना प्रत्युत्तर देण्यात छगन भुजबळ आघाडीवर होते. छगन भुजबळांसारखा ओबीसीचा एक मोठा नेता भाजपात आल्याने भाजपाची पकड मजबूत होईल. तसेच लवकर बिहारची विधानसभा निवडणूक आहे, तेथील ओबीसी मतदारांमध्ये भुजबळ यांना बऱ्यापैकी मान्यता आहे, त्याचाही फायदा भाजपाला होऊ शकतो, असं काही भाजपा नेत्यांना वाटतं. तसेच लोकसभा निवडणुकीच्या वेळी गृहमंत्री अमित शाह यांनी भुजबळ यांनी नाशिकमधून निवडणूक लढवावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती, त्यामुळे दिल्लीतील भाजपाचे वरिष्ठ नेते भुजबळांबाबत अनुकूल असल्याचे दिसून येते.