मुंबई:विधिमंडळाचे तीन दिवसीय अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. तर 9 डिसेंबरला बहुमत चाचणी घेण्यात येणार आहेत. अधिवेशनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाला संबोधित करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी गुरुवारी सांगितले, " 15 व्या विधानसभेचे नवनिर्वाचित 288 सदस्य 7 आणि 8 डिसेंबर रोजी शपथ घेणार आहेत. 9 डिसेंबर रोजी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. तसेच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्याचदिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. पुढे पवार म्हणाले, "अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेणार आहे. त्यानंतर मंत्रिमंडळातील जागावाटपाबाबत चर्चा करणार आहोत.
राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार म्हणाले, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीला भेट देणार आहोत. राज्य सरकारनं 6 डिसेंबर रोजी मुंबईत सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालये शुक्रवारी बंद राहणार आहेत. तसेच दारूची दुकाने बंद राहणार आहेत".
- मंत्रिमंडळाचा विस्तार हा 11 डिसेंबर किंवा 12 डिसेंबरला होऊ शकतो. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे 16 डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होणार आहे. हे अधिवेशन 21 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. देवेंद्र फडणवीस हे चहापाण्यासाठी विरोधी पक्षाच्या आमदारांना प्रथेप्रमाणं 15 डिसेंबरला निमंत्रित करणार आहेत.