मुंबई -देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड झाल्यानंतर उद्या 5 डिसेंबरला सायंकाळी देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. केंद्रातून आलेले निरीक्षक गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडवणीसांच्या नावाची घोषणा केल्यानंतर भाजपा आमदारांनी, नेत्यांनी विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये एकच जल्लोष केलाय. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर केलेल्या पहिल्याच भाषणात देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या मागील दोन वेळच्या मुख्यमंत्रिपदाचा धावता आढावा घेत विरोधकांनाही चिमटे काढलेत. तसेच यंदाच्या ऐतिहासिक विजयाने आपली जबाबदारी वाढली असून, आपली प्राथमिकता जनतेला दिलेली आश्वासन पूर्ण करण्यावर असायला हवी, असे ते म्हणालेत. विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये ते बोलत होते.
महाराष्ट्रातील जनतेला साष्टांग दंडवत :याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या सर्वांनी एकमताने मला विधिमंडळ गटाचा नेता म्हणून माझी निवड केली म्हणून मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. यावेळची निवडणूक ऐतिहासिक अशी राहिलीय. या निवडणुकीने आपल्यासमोर एक गोष्ट ठेवली आहे, ती म्हणजे, "एक है तो सेफ है.. आणि मोदी है, तो मुमकिन है'.. मोदी यांच्या नेतृत्वात विजयाची मालिका लोकसभेनंतर पुन्हा एकदा हरियाणापासून सुरू झालीय आणि महाराष्ट्राच्या जनतेने जे जनमत आपणाला दिले आहे, त्याकरिता महाराष्ट्रातील जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो. या संपूर्ण प्रक्रियेत पूर्णपणे आपल्यासोबत असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही मी मनापासून आभार मानतो, असंही देवेंद्र फडणवीसांनी अधोरेखित केलंय.
अडीच वर्षांत एकही आमदार सोडून गेला नाही :फडणवीस पुढे म्हणाले की, आपली प्राथमिकता, आपण सुरू केलेल्या योजना आणि आपण दिलेली आश्वासनं ही पूर्ण करण्याबरोबरच महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी आपणाला सातत्याने कार्यरत राहायचं आहे. 2019 साली जनतेचा कौल आपणाला भेटला होता, पण दुर्दैवाने तो हिसकावून घेण्यात आला आणि जनतेसोबत एक प्रकारे बेइमानी त्या काळात झाली. सुरुवातीच्या त्या अडीच वर्षांमध्ये ज्याप्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आमदार, नेत्यांना त्रास देण्यात आला, अशाही परिस्थितीमध्ये मला या गोष्टीचा अभिमान आहे की, अडीच वर्षात एकही आमदार आपणाला सोडून गेला नाही. सगळे नेते, सर्व आमदार संघर्ष करीत होते आणि त्याकरिता 2022 साली पुन्हा आपलं सरकार स्थापन झालं आणि यंदा प्रचंड बहुमत महायुतीला मिळालंय. त्यामुळे एक प्रकारचा इतिहास या महाराष्ट्रात लिहिला गेलाय, जो अभूतपूर्व आहे, असंही फडणवीस म्हणालेत.
चार गोष्टी मनाविरुद्धही होतील :देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, माझ्यासारखा बूथचा कार्यकर्ता म्हणून ज्याने काम चालू केलं, अशा सामान्य माणसाला सर्वोच्च पदापर्यंत 3 वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच बसवलं. एकदा 72 तासांसाठीच होतो, परंतु टेक्निकली होतो. अशा प्रकारे 3 वेळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर बसण्याचा मान-सन्मान त्यांनी दिलाय. याकरिता मी सर्वांचे आभार मानतो. यापुढे आपल्याला सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत, म्हणून पुढील वाट ही संघर्षाची आहे. येत्या काळामध्ये चार गोष्टी आपल्या मनाप्रमाणे तर चार गोष्टी आपल्या मनाविरुद्धसुद्धा होतील. तरीसुद्धा आपण सर्व मोठ्या मनाने एकत्रित काम करू आणि आपली शक्ती काय आहे, ते निश्चितपणे या ठिकाणी दाखवून देऊ. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी 24 तास आमचे सरकार काम करेल, असं आश्वासन मी देतो, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
चार गोष्टी मनाप्रमाणे अन् चार गोष्टी आपल्या मनाविरुद्धसुद्धा होतील तरीही...; देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
यंदाच्या ऐतिहासिक विजयाने आपली जबाबदारी वाढली असून, आपली प्राथमिकता जनतेला दिलेली आश्वासन पूर्ण करण्यावर असायला हवी, असे ते म्हणालेत. विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस (Source- ETV Bharat)
Published : Dec 4, 2024, 4:00 PM IST