नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सध्या राज्यात 'आदर्श आचारसंहिता' लागू आहे. निवडणुकीच्या काळात मतं मिळविण्यासाठी मतदारांना रोख रक्कम दिली जात असल्याचा विरोधकांकडून आरोप होत असतो. या बाबींना आळा घालण्यासाठी आयकर विभाग, मुंबई पोलीस आणि निवडणूक आयोगाचे कर्मचारी हे गस्त घालत असतात. तसंच छापेमारी करत असतात. त्यातच आता नवी मुंबईमधील नेरुळ सेक्टर 16 येथील रो-हाऊसमधून पोलिसांनी अडीच कोटी रुपये जप्त (Rs 2.5 crore in cash was seized) केले आहेत. नेरुळ पोलीस ठाणे आणि निवडणूक आयोग यांनी ही संयुक्त कारवाई केली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण? :या प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की, नवी मुंबईतील नेरुळ पोलीस ठाण्याला नेरुळ सेक्टर 16 येथील एका रो-हाऊसमध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या घरात रोकड असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदरील रो-हाऊसवर छापा टाकण्यात आला असता एकूण 2 कोटी 60 लाखांची रोकड सापडली. ही रक्कम कोणी आणि कोणत्या उद्देशानं घरात ठेवली होती, याचा अधिक तपास नेरुळ पोलीस करत आहेत.