मुंबई - राज्यात महायुतीने एकहाती सत्ता स्थापन केली असली तरी मुख्यमंत्रिपदावरून अजूनही पेच कायम आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्याने देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झालाय. दिल्लीत महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासोबत मॅरेथॉन बैठक झाली. तरीही मुख्यमंत्री कोण असणार? या नावावर अद्यापही सस्पेन्स कायम आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यावरून आक्षेप नोंदवला असल्याकारणाने मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा व्हायला उशीर तर होत नाही ना? अशी शंका आता निर्माण झालीय.
फडणवीस यांच्या नावावर एकमत परंतु... :23 नोव्हेंबरला राज्यातील सत्ता स्थापनेचा निकाल लागून आता आठवडा होत आला तरीही राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आलेलं नाही. महायुतीला स्पष्ट बहुमत असतानासुद्धा मुख्यमंत्री पदावरून महायुतीत विशेषतः भाजपामध्ये अंतर्गत कलह सुरू आहे. ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत पुन्हा नव्या जोमाने विधानसभेसाठी रणशिंग फुंकले आणि त्यांच्या नेतृत्वात भाजपाने राज्यात अभूतपूर्व असं यश संपादन केलं. या कारणाने मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार देवेंद्र फडणवीस हेच असून, जवळपास त्यांचे नाव निश्चित झालंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ म्हणाले आहेत की, वास्तविक 2022 मध्ये शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, अशी आम्हाला अपेक्षा होती. तरीही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. हा त्यांचा मोठेपणा होता. परंतु आता देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असंही भुजबळ म्हणालेत. मग इतक्या सर्वांचा पाठिंबा असतानाही देवेंद्र फडणवीसांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात उशीर होण्यामागे मराठा नेते, मनोज जरांगे पाटील फॅक्टर तर नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
मी पुन्हा उपोषणाला बसलोच : मागील दोन वर्षांपासून राज्यात मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पाटील यांनी रान उठवलंय. मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा होत असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावरच हल्ला केलाय. तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री झालात तर, मी पुन्हा उपोषणाला बसलोच असं समजा. तुम्ही पुन्हा या, मी पुन्हा उपोषणाला बसतो. काय व्हायचे ते होऊ द्या. आपल्याकडे सुट्टी नाही, अशा पद्धतीचा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलाय. यापूर्वी महायुती सरकारकडून त्यांना अनेक आश्वासनं देण्यात आलीत. परंतु मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. विधानसभा निवडणुकीतही मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेत उमेदवार उभे केले नाहीत. परंतु मराठा समाज ताकतीने अनेक मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहिला. याकरिता आता सरकारने मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहून त्यांना आरक्षण मिळवून द्यावे, मस्तीत येऊ नये. आजकालचे सरकार हे भावनाशून्य असून, त्यांना भावनेची किंमत नाही. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाबाबत काम केलं, पण आम्हालासुद्धा त्यांच्यासोबत लढावे लागले, असंही मनोज जरांगे पाटील म्हणालेत.