पुणे-राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून पाच दिवस झाले तरी महायुतीकडून मुख्यमंत्री कोण याचं काही निश्चित होत नाहीये.अशातच आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी कार्यकर्ता म्हणून पहिल्या दिवसापासून आम्हा सर्वांची इच्छा असल्याचं सांगितलंय. 134 व्या महात्मा फुले पुण्यतिथीच्या निमित्ताने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुण्यातील महात्मा फुले वाडा येथील महात्मा फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय.
आज किंवा उद्या पर्यंत कोण मुख्यमंत्री होईल :यावेळी रुपाली चाकणकर यांना महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या की, राज्यातील सर्वच जनतेला उत्सुकता आहे की, महायुतीकडून कोण मुख्यमंत्री होणार आहे. राज्यातील तिन्ही पक्षाचे नेते आज दिल्लीला गेले असून, आज यावर चर्चा होणार आहे. आज किंवा उद्या पर्यंत कोण मुख्यमंत्री होईल हे स्पष्ट होईल, असा मला विश्वास आहे. तसेच राज्यातील जनतेने महायुतीला भरघोस यश दिलंय. आमची आताच नाही तर पहिल्यापासून आमची मागणी आहे की, अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत, असं यावेळी रुपाली चाकणकर म्हणाल्यात.