मुंबई -दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांच्या प्रक्षेपणात राजकीय पक्षांचे पोस्टर दाखवून छुपी जाहिरात केल्याच्या काँग्रेस पक्षाच्या तक्रारीची राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दखल घेतलीय. याप्रकरणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांना नोटीस पाठवण्यात आली असून, त्यांच्याकडून उत्तर मागवण्यात आलंय. राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू असताना दूरचित्रवाहिन्यांवरील काही मालिकांमध्ये शिवसेना शिंदे पक्षाच्या पोस्टरचे प्रदर्शन करून त्या पक्षाची जाहिरात केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला होता.
राजकीय पक्षाविरोधात कायदेशीर कारवाई:या प्रकारे छुप्या प्रचाराविरोधात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना भेटून त्यांना पत्र देऊन या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. सचिन सावंत यांच्या या पत्राची दखल घेत शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांना नोटीस बजावण्यात आली असून, उत्तर सादर करण्यास सांगण्यात आलंय. याप्रकरणी मोरे यांनी पक्षाची भूमिका मांडणारे उत्तर निवडणूक आयोगाकडे सादर केल्याचे सांगण्यात आलंय. स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट, मातीच्या चुली आणि इतर काही मालिकांमध्ये चित्रीकरण करताना त्यामध्ये शिवसेनेच्या रस्त्यावर लावण्यात आलेल्या पोस्टरचा अंतर्भाव करण्यात आला होता. खरं तर हा एक प्रकारे शिवसेनेचा प्रचार असल्याचा आणि प्रेक्षकांमध्ये पक्षाचे नाव बिंबवण्याचा प्रकार असल्याचा आरोप करत काँग्रेसने या प्रकाराला आक्षेप घेतला आणि या प्रकरणाची तक्रार केली होती. हा प्रकार म्हणजे छुप्या प्रकारची जाहिरात असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती आणि यासाठी दूरचित्रवाहिन्यांना काही रक्कम दिली गेल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करावी आणि यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्यास संबंधित दूरचित्रवाहिनी आणि राजकीय पक्षाविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली होती.
महायुतीने खालच्या दर्जाचा प्रचार केला: या निवडणुकीत महायुतीने खालच्या दर्जाचा प्रचार केला आणि साम, दाम, दंड, भेद याचा वापर कसा केला, याचे हे मूर्तीमंत उदाहरण असल्याची टीका सचिन सावंत यांनी केलीय. असा प्रकार देशात प्रथमच घडल्याने त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकाराचे पुरावे आम्ही आयोगाला दिले असून, त्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केल्याची माहिती सचिन सावंत यांनी दिलीय.
वाहिन्यांवरील छुप्या प्रचाराबाबत निवडणूक आयोगाची शिवसेनेला नोटीस, काँग्रेसच्या तक्रारीची दखल
सचिन सावंत यांच्या या पत्राची दखल घेत शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांना नोटीस बजावण्यात आली असून, उत्तर सादर करण्यास सांगण्यात आलंय.
सचिन सावंत (ETV Bharat File Photo)
Published : 4 hours ago