मुंबई -विधानसभा निवडणुकीचे मतदान 20 नोव्हेंबरला रोजी होणार असून, 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. निकालासाठी अवघे चार दिवस बाकी आहेत. यामुळं प्रचार शिगेला पोहोचला असून, जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्षातील नेते आणि उमेदवारांची चढाओढ सुरू आहे. अशातच सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर चिखलफेक करताना दिसताहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. परंतु आता विधानसभा निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढवत आहे. तसेच प्रचारसभेतून मनसे महाविकास आघाडीसह महायुतीवरही टीकास्त्र डागताना दिसत आहे. कल्याणमधील मनसेचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर बोचरी टीका केलीय. आमदार राजू पाटील यांनी बोलताना म्हटले की, राज्यातील राजकारणाचा स्तर कमालीचा खालावला आहे. राजकारण मोठ्या प्रमाणात गढूळ झालंय. राज्यातील राजकारण शिंदे पिता-पुत्रांनी गढूळ करण्याचं काम केलंय. त्यामुळं त्यांना आता संपवण्याची वेळ आल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी दिलाय. राजू पाटील यांच्या या इशारानंतर राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
राजू पाटील तथ्यच बोलले- राऊत :दुसरीकडे आमदार राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर सत्ताधारी-विरोधकांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्यात. राज्यातील राजकारण गढूळ करण्याचे काम शिंदे पिता-पुत्रांनी केलंय, असं आमदार राजू पाटील बोललेत. सध्या फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे आणि शिंदे पिता-पुत्रांनी राजकारण गढूळ केलंय. तसेच त्यांना संपवण्याची वेळ आली आहे, असं आमदार राजू पाटील बोललेत ते अगदी योग्य बोललेत, असंही विनायक राऊत म्हणालेत. परंतु ही बाब त्यांनी त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून द्यावी. कारण त्यांचे अध्यक्ष हे देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक करत असतात. त्यांच्या भूमिकांचे समर्थन करीत असतात. लोकसभेला राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि आता ते स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. परंतु राजू पाटील बोलले त्याच्यात तथ्य असून, केवळ त्यांनी त्यांच्या अध्यक्षांच्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिली पाहिजे, अशी प्रतिक्रिया शिवसेना (ठाकरे गटाचे) माजी खासदार विनायक राऊत यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना दिलीय.