अमरावती :महाकुंभ मेळाव्यानिमित्त (Mahakumbh 2025) प्रयागराज (Prayagraj) येथे मौनी अमावस्येच्या पर्वावर स्नानासाठी अमरावतीतून (Amravati) प्रयागराजला गेलेल्या भाविकांचे प्रचंड हाल झाल्याचं बघायला मिळालं. तसंच ज्यांनी या यात्रेचं आयोजन केलं त्यांनी भाविकांना वाऱ्यावर सोडून पळ काढल्याचा आरोप केला जात आहे.
चहा, नाश्ता, जेवण कशाचाच पत्ता नाही : अमरावती शहरातून 27 डिसेंबर रोजी एकूण 600 जण प्रयागराजला निघाले. सुरज मिश्रा नावाच्या व्यक्तीनं स्लीपर बससाठी 15 हजार आणि आसन व्यवस्था असणाऱ्या बससाठी प्रत्येकी सहा हजार रुपये घेऊन भाविकांना प्रयागराज, हरिद्वार आणि अयोध्या येथे यात्रेसाठी नेलं. या प्रवासादरम्यान प्रत्येकाला चहा, नाश्ता, जेवण मिळेल आणि राहण्याची देखील सगळी व्यवस्था उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं. मात्र, वास्तवात प्रवाशांना चहा आणि जेवण दोन्ही पुरवण्यात आलं नाही. वृद्ध आणि मधुमेहाच्या रुग्णांना यामुळं प्रचंड त्रास सहन करावा लागला. या संदर्भात अनेकांनी प्रचंड रोष व्यक्त केलाय. विशेष म्हणजे या यात्रेसाठी संपूर्ण पैसे भरले असताना देखील सर्व यात्रेकरूंना स्वतःच्या खाण्यापिण्याची व्यवस्था स्वतःच करावी लागली, असं देखील सांगितलं जात आहे.
भाविकांच्या प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter) राहण्याची व्यवस्था नाही : प्रयागराज येथे पोहोचल्यावर राहण्याची उत्तम व्यवस्था आहे, असं सांगण्यात आलं होतं. मात्र, या ठिकाणी अतिशय अडचणींचा सामना करत पोहोचल्यावर वीस बाय वीसच्या टेन्टमध्ये 500 जणांना ठेवण्यात आलं. तसंच बाजूला भंडारा सुरू असून तिथं जेवण करायला सांगितलं. त्याठिकाणी अक्षरशः गवतावर झोपावं लागलं आणि आज पहाटे चार वाजताच तिथल्या साध्वीनं हाकलून लावल्याचं दुःख देखील भाविकांनी व्यक्त केलं.
36 तासांचा प्रवास : अमरावतीवरुन प्रयागराजच्या दिशेनं निघाल्यावर प्रत्येक टोल नाक्यावर दोन अडीच तासापर्यंत थांबावं लागलं. आयोजकांनी टोल देखील भरला नाही. एका ठिकाणी सर्वांना गाडीतून उतरवल्यावर तिथून 50 किलोमीटर पायपीट करत आम्ही प्रयागराजला पोहोचलो. ज्यांना पायी चालण्याचा त्रास आहे, त्यांना आता प्रचंड वेदना झाल्या. आमची आर्थिक लूट तर झालीच त्यासोबतच प्रचंड मनस्ताप झाल्याचा आरोप देखील भाविकांनी केलाय.
आमदार रवी राणा यांच्याकडं तक्रार : या यात्रेचं आयोजन करणारा सुरज मिश्रा हा आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्याच्या ढिसाळ नियोजनासंदर्भात आमदार रवी राणा यांच्याकडं तक्रार करण्यात आली आहे. आमदार राणांनी त्याची कानउघडणी करणार असं सांगितलं. मात्र, गत तीन दिवसांपासून सुरज मिश्राचा फोनच बंद आहे. त्यामुळे त्याची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. तर आमदार रवी राणा यांनी सुरज मिश्रा सारख्या कार्यकर्त्यांना सोबत ठेवू नये, अशी मागणी भाविकांनी केलीय.
पालकमंत्र्यांची सारवासारव - या प्रकरणी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना यासंदर्भात विचारणा केली असता, त्यांनी या यात्रेकरुंना सर्वतोपरि मदत दिली जात असल्याचं त्यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितलं. तसंच आ. रवी राणा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही या भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात येत असल्याचं आमच्या प्रतिनिधीला सांगितलं.
हेही वाचा -
- प्रयागराजमधील दुर्घटनेनं 2003 च्या नाशिकमधील कुंभमेळ्याच्या दुःखद आठवणींना उजाळा, काय घडलं होतं?
- महाकुंभ मेळाव्यात केवळ व्हीआयपीवर लक्ष केंद्रित, राहुल गांधींसह मल्लिकार्जून खर्गे यांची टीका
- महाकुंभ मेळाव्यात पोहोचल्या अमेरिकेतील योग शिक्षिका, म्हणाल्या, "माझ्या देशातील इतर लोकांनाही..."