सातारा : भारतात सर्वाधिक 85 टक्के उत्पादन घेतल्या जाणाऱ्या महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला डाक विभागानं टपाल तिकीटावर स्थान दिलंय. महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरच्या शिरपेचात यानिमित्तानं मानाचा तुरा खोवला गेला आहे. स्ट्रॉबेरीला डाक तिकीटावर स्थान मिळाल्यानं सातारकर नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
महाबळेश्वरमध्ये देशातील 85 टक्के स्ट्रॉबेरीचं उत्पादन :लालचुटूक स्ट्रॉबेरीचं छायाचित्र असलेलं विशेष चित्रात्मक टपालाचं अनावरण करण्यात आलं आहे. मुंबईतील डाक कार्यालयात या टपाल तिकीटाचं नुकतंच अनावरण झालं. स्ट्रॉबेरीसाठीचं पोषक वातावरण असलेल्या महाबळेश्वर परिसरातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देऊन स्ट्रॉबेरीसारख्या पिकाचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली. भारतात सर्वाधिक 85 टक्के स्ट्रॉबेरीचं उत्पादन एकट्या महाबळेश्वर तालुक्यात घेतलं जाते.
टपाल विभागाकडून स्ट्रॉबेरीचा सन्मान :महाबळेश्वर तालुक्यातील दोन हजाराहून अधिक शेतकरी स्ट्रॉबेरीची शेती करत आहेत. स्ट्रॉबेरीनं महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी लँड, अशी भौगोलिक ओळख मिळवून दिली. या फळाची जागतिक स्तरावरील ओळख आणि लोकप्रियता लक्षात घेऊन टपाल विभागाकडून टपाल तिकिटावर स्थान देत स्ट्रॉबेरीचा विशेष सन्मान करण्यात आला आहे.
मुंबईत झालं तिकिटाचं अनावरण :मुंबई टपाल कार्यालयातील एका शानदार सोहळ्यात स्ट्रॉबेरीचं छायाचित्र असलेल्या विशेष टपाल कॅन्सलेशनचं अनावरण करण्यात आलंय. यावेळी डाक विभागाच्या सचिव वंदिता कौल, महाराष्ट्र आणि गोवा पोस्टल सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग, मुंबई विभागाच्या पोस्टमास्टर जनरल सुचिता जोशी उपस्थित होत्या.