महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देवदर्शनाचा भूलभुलैया, असं आहे अचलपूरच्या श्री दत्त मंदिराचं वैशिष्ट्य - Shri Datta Mandir - SHRI DATTA MANDIR

Datta Temple : अचलपूरचं श्री दत्त मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे. या मंदिरात अनेक मुर्ती असून अनेक भाविक इथे दर्शनासाठी येतात.

Datta Temple
दत्त मंदिर (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 10, 2024, 3:28 PM IST

अमरावती - Datta Temple : रिद्धी-सिद्धीसह गणराया, राम,सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघन आणि हनुमंत, अतिशय सुंदर रूप असणारे श्री राधाकृष्ण, श्री महालक्ष्मी, अन्नपूर्णा माता, जय विजय आणि वाहन गरुड आणि माता लक्ष्मीसह विष्णू दरबार, महादेवाची पिंड, संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम यांच्यासह मुख्य गाभाऱ्यात श्री दत्ताचे दर्शन अचलपूर येथील सुलतानपुरा परिसरात असणाऱ्या दत्त मंदिरात भाविकांना घडतं. मात्र या मंदिरात श्री दत्त वगळता इतर सर्व देवतांच्या दर्शनासाठी खास असा भूलभुलैया भाविकांना पार करावा लागतो. अनेकदा सर्व फिरून मुख्य गाभाऱ्यात असणाऱ्या श्री दत्ताच्या मूर्ती समोरच भाविक येतात. त्यांचे बाकी देवांचे दर्शन होतच नाही. हा भूलभुलैया योग्यपणे पार केला तर या मंदिरात एकाच रेषेत असणाऱ्या सर्व देवांचे दर्शन भाविकांना सहज घडू शकतं. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील या खास भूलभुलैया मंदिरासंदर्भात 'ईटीव्ही भारत'शी बोलताना मंदिराचे विश्वस्त आणि येथील पूजारी किशोर गेरंज यांनी महत्वपूर्ण माहिती दिली.

अद्भुत दत्त मंदिर (Reporter)

दोनशे वर्षांपूर्वी मंदिराची स्थापना : अचलपूरच्या सुलतानपुरा परिसरात महावीर पेठेत 200 वर्षांपूर्वी सदानंद महाराज यांचे शिष्य विमलानंद महाराज आणि हरीबाबा कासार यांनी मंदिराची स्थापना केली. आजानूबाहू म्हणजेच गुडघ्यापेक्षाही लांब हात असणारे हरीबाबा कासार महाराज यांनी 700 स्क्वेअर फूट जागेमध्ये एकूण नऊ मंदिरं स्थापन केली. या मंदिरातील सर्व मूर्ती ह्या खास राजस्थान मधून संगमरवरी दगडांच्या तयार करून आणण्यात आल्या आहेत. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात श्री दत्ताचे दर्शन सहज घडत असले तरी इतर आठ मंदिरात जाण्यासाठी भाविकांना देवदर्शनासाठी मंदिरात हजर असणाऱ्या जाणकार व्यक्तीलाच सोबत न्यावं लागतं असं किशोर गेरंज यांनी सांगितलं.

श्री दत्ताच्या मंदिराखाली शिवालय : पूर्व मुखी असणाऱ्या या मंदिरात सकाळी सूर्य उदय होताच सूर्याची किरणं थेट श्री दत्ताच्या मुखावर पडतात. श्री दत्ताचे दर्शन घेतल्यावर सर्वात आधी उजव्या बाजूनं लाकडाच्या पायऱ्यांवरून खाली उतरून महादेवाच्या पिंडीचं दर्शन भाविकांना घडतं. महादेवाची ही पिंड श्री दत्ताच्या गाभाऱ्याच्या अगदी खाली आहे. विशेष म्हणजे श्री दत्तावर टाकलेली फुलं खाली थेट महादेवाच्या पिंडीवर जाऊन पडतात. मंदिराच्या बाहेर खालच्या बाजूला चारी दिशेनं छोट्याशा खिडक्या करण्यात आल्या आहेत. या खिडक्यांमधून थेट प्रकाश महादेवाच्या पिंडीवर जाऊन पडतो.

मंदिरात आहे विष्णू दरबार : श्री दत्ताचे आणि शिवलिंगाचे दर्शन घेतल्यावर सर्वात आधी संत ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन भाविकांना घडतं. यानंतर तळघरात लाकडाच्या पायऱ्या उतरून आत मध्ये शिरल्यावर सर्वात आधी विष्णू दरबार लागतो. या ठिकाणी विष्णू आणि लक्ष्मीसह त्यांचे रक्षक जय विजय आणि विष्णूचे वाहन गरुड या मुर्ती आहेत. विष्णू दरबाराचे दर्शन घेतल्यावर पुन्हा वरच्या दिशेनं पायऱ्या चढल्यावर एका बाजूला महालक्ष्मी आणि अन्नपूर्णा मातेचं दर्शन घडतं.

रिद्धी सिद्धीसह गणरायाची सुंदर मूर्ती : विष्णू दरबार आणि महालक्ष्मी आणि अन्नपूर्णा मातेचं दर्शन घेतल्यावर, पुन्हा एका तिसऱ्या दिशेनं लाकडी पायऱ्या चढल्यावर एका बाजूला रिद्धी आणि दुसऱ्या बाजूला सिद्धी आणि मधोमध असणाऱ्या श्री गणरायाचं दर्शन भाविकांना घडतं. या मंदिरातील गणरायाची मूर्ती अतिशय देखणी आणि सुंदर आहे. गणपती बाप्पा कमळावर विराजमान असून त्यांच्या नाभीतून नाग छातीपर्यंत आला असल्याचं या मूर्तीमध्ये दिसतं.

लाल वस्त्र परिधान केलेल्या राधा कृष्णाचे दर्शन : रिद्धी सिद्धीसह श्री गणरायाचे दर्शन घेतल्यावर आणखी खालच्या बाजूनं लाकडाच्या पायऱ्या उतरल्यावर सुंदर राधा कृष्णाची मूर्ती समोर दिसते. लाल वस्त्र परिधान करून असणारी राधा कृष्णाची मूर्ती अतिशय सुंदर असून राधा कृष्णाच्या मंदिरासमोरून बराच वेळ भाविकांना निघावेसेच वाटत नाही, इतकी ही अप्रतिम मूर्ती आहे.

भाविकांच्या समोर रामदरबार :श्री राधा कृष्णाचे दर्शन घेतल्यावर पुन्हा लाकडाच्या पायऱ्यांनी वर चढल्यावर एका कोपऱ्यामध्ये सुंदर असा राम दरबार लागतो. राम सीता लक्ष्मण यांच्यासह भरत शत्रुघ्न आणि हनुमान अशा मूर्ती या दरबारात पाहायला मिळतात. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न असे चारही भाऊ एकाच गाभाऱ्यात असणारे विदर्भातील हे एकमेव मंदिर आहे. राम दरबारानंतर तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन पुन्हा आठ-दहा पायऱ्या खाली उतरल्यावर थेट श्री दत्ताच्या मूर्तीजवळ भाविक येतात. विशेष म्हणजे या सर्व देवांचे दर्शन घेऊन श्री दत्ताच्या मूर्ती समोर येईपर्यंत खाली असणाऱ्या शिवलिंगाला एक प्रदक्षिणा पूर्ण होते.

मंदिरात आहे शंभर वर्षाचं कॅलेंडर :या मंदिरातील आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे श्री दत्त मंदिराच्या गाभाऱ्यासमोरच 100 वर्षाचं लाकडी कॅलेंडर आहे. 1923 ते 2023 पर्यंतची वर्ष लाकडी आकाराच्या ह्या गोल कॅलेंडरमध्ये आहेत. हे कॅलेंडर दोन भागात विभागले असून ते चक्राकार फिरतं, वरील भागात 1923 ते 2023 पर्यंतची वर्ष दिली आहेत. खालच्या भागात महिने वार दिले आहेत. वर्षाचे चक्र फिरवून महिन्याच्या रेषेवर आणलं असता त्या रेषेला समांतर असे वारांमधून व्यक्तीचा जन्म वार ठरतो. दर चार वर्षांनी येणाऱ्या लीप इयरचा देखील या कॅलेंडरमध्ये विचार करण्यात आला आहे. या कॅलेंडरचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 'श्री गुरु सदानंद' हे पासवर्ड टाकल्यावर ते सुरू होतं अशी माहिती देखील किशोर गेरंज यांनी दिली.


मंदिराच्या कळसात तुपाचा गडू :काही वर्षांपूर्वी या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. मंदिराचे जुने स्वरूप पूर्वीसारखेच कायम ठेवून, केवळ या ठिकाणी नव्या फरश्या वगैरे बसवण्यात आल्या. या कामादरम्यान मंदिराच्या कळसाची दुरुस्ती करताना, या कळसावर असणाऱ्या अगदी गोल भागात मंदिर उभारताना ठेवण्यात आलेला तुपाचा गडू आढळला. या गडूमधील तूप अगदी नीट होते. हा गडू पुन्हा एकदा तुपासह या कळसामध्ये ठेवण्यात आला, असल्याचं किशोर गेरंज यांनी सांगितलं.



स्वामी समर्थांचे केंद्र :श्री दत्त मंदिराच्या वरच्या मजल्यावर स्वामी समर्थ महाराजांचे केंद्र चालविले जाते. या ठिकाणी बालसंस्कार शिबिर देखील घेतले जातात. या मंदिरामध्ये नव्यानं केवळ विठ्ठल रुक्मिणी आणि संत गजानन महाराज यांच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. अचलपूरच्या सुलतानपुरा परिसरातील नागरिकांच्या वतीनं स्थापत्य कलेचा अद्भुत नमुना असणाऱ्या या मंदिराचे जतन केले जात असल्याचं किशोर गेरंज यांनी म्हटलं.

ABOUT THE AUTHOR

...view details