अमरावती :शहरात नवीन महामार्गावर असणाऱ्या श्रीकृष्ण मंदिराजवळ मंगळवारी सायंकाळी एका महिलेची दुसऱ्या महिलेनं हत्या केल्यानं खळबळ उडाली. या दोन्ही महिला विवाहित असून, या दोघींचंही सूरज देशमुख नावाच्या युवकासोबत मागील सात, आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या दोघींनाही सूरज केवळ आपल्यासोबत राहावा, असं वाटत असल्यामुळं एकीनं दुसरीची हत्या केली असल्याचं पोलीस तपासात समोर आलं.
असा आहे संपूर्ण प्रकार : नवीन महामार्गावर शुभांगी या महिलेची सीमा या महिलेनं हत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. त्रिकोणी प्रेम प्रकरणातून हा प्रकार झाला असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी सीमा आणि सूरज देशमुख यांना अटक केली. अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा येथील रहिवासी सूरज देशमुख याचं चांदूर रेल्वे तालुक्यातील एका गावातील रहिवासी असणारी महिला सीमा आणि वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील रहिवासी शुभांगी या दोन्ही महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या दोघी विवाहित असून, दोघीही नवऱ्यापासून विभक्त राहतात. या दोघींनाही सूरज देशमुख यानं अमरावतीत विविध भागात भाड्यानं घर देखील करून दिलं. दोघीही परिसरात धुणी- भांडी घासण्याचं काम करायच्या. सूरजचं दोन्ही महिलांसोबत असणारे संबंध दोघींनाही माहिती होते. मागील काही दिवसांपासून मात्र या दोघींमध्ये सूरजवरून खटके उडायला लागले. तिघांमध्ये सुरू असणारा हा वाद संपुष्टात यावा यासाठी मंगळवारी तिघांनीही भेटून तोडगा काढण्याचा ठरवलं.
मंगळवारी नेमकं काय घडलं? :शुभांगी, सूरज आणि सीमा यांचं मंगळवारी भेटायचं ठरलं होतं. शुभांगी मंगळवारी सकाळीच आर्वीवरून अमरावतीला आली. तिच्यासोबत राजेश्री ही मैत्रीण होती. दुपारी या दोघीही पंचशील नगर परिसरात राहणाऱ्या प्रज्ञा या मैत्रिणीकडं गेल्या होत्या. दुपारी चारच्या सुमारास सूरज यानं शुभांगीला कॉल करून बियाणी चौकात भेटायला बोलावलं. शुभांगी आणि राजेश्री सूरजला भेटायला बियाणी चौकात पोहोचल्या. यावेळी सूरजन सीमाला भेटायला नवीन महामार्गावर असणाऱ्या कृष्ण मंदिराजवळ बोलावलं. त्यानंतर शुभांगी आणि राजेश्री या दोघींनाही तिथं नेलं.