बारामतीLok Sabha Election 2024 :आगामी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पवार विरुद्ध पवार अशी होणार, असं चित्र आता दिसत आहे. ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचं चित्र सध्या बारामतीत पाहायला मिळत आहे. बारामतीत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी आत्याच्या ( खासदार सुप्रिया सुळे) यांच्या विरोधात थेट प्रचार करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. ते आज बारामतीत पत्रकारांशी संवाद साधत होते.
महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार :उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट दिली होती. यावेळी योगेंद्र पवार यांनी शरद पवार यांच्या सूचनेनुसार काम करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी बारामतीला भेट दिली. आगामी लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
जय पवार आजपासून बारामती दौऱ्यावर : "लोकसभेची तयारी म्हणून हा दौरा आजपासून सुरू झाला आहे. हा दौरा बारामती तालुक्यात करणार आहे. बारामती येथील राष्ट्रवादी कार्यालयात पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रं दिली आहेत", असं जय पवार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना सांगितलं. अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी नुकतीच शरद पवार यांच्या कार्यालयाला भेट होती. यावर जय पवार म्हणाले, "कुटुंबात ज्याला पसंती असेल, त्याला प्रमोट करू. अजित पवारांनी भाषणात म्हटल्याप्रमाणं घरातील इतर काही लोक माझा प्रचार करणार नाहीत. आपण इतरांना असं काही सांगू शकत नाही. त्यांना जे करायचे ते करू द्या, आम्ही आमचं करू," असं जय पवार म्हणाले. आगामी लोकसभेच्या तयारीबाबत बोलताना रॅली, मोर्चे, सभा, घेऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असंदेखील ते म्हणाले.