महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बहिणीच नव्हे, लेकीही होणार मालामाल; 'लाडक्या लेकीं'च्या खात्यात जमा होणार 'एवढी' रक्कम - LEK LADKI YOJANA

राज्य सरकारनं मुलींच्या सक्षमीकरणासाठी 'लेक लाडकी योजना' सुरु केलीय. या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींना सरकारकडून 1 लाख 1 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

Lek Ladki scheme
'लाडकी लेक (Source- ETV Bharat/AI image of Kid)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 8, 2024, 3:59 PM IST

Updated : Dec 10, 2024, 11:28 AM IST

पुणे : राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेमुळं महायुतीला निवडणुकीत यश मिळवता आलं. 'मुख्यमंत्री लाडकी बहिणी' योजनेचा पुण्यातील 21 लाख 'लाडक्या बहिणीं'ना लाभ मिळाला आहे. आता 4 हजार 'लाडक्या बहिणीं'च्या खात्यात पहिल्या टप्प्यातील प्रत्येकी 5 हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत. मुलीच्या जन्मापासून ती 18 वर्षांची होईपर्यंत टप्प्याटप्प्यानं 1 लाख 1 हजार रुपये या योजनेच्या आधारे मिळणार आहेत.

लाभ कोणाला मिळणार? : राज्य सरकारनं 'माझी कन्या भाग्यश्री' योजना बंद करून 'लेक लाडकी' ही योजना सुरू केली. या योजनेला प्रतिसाद कमी मिळत असल्यानं त्यातील एक किंवा दोन मुलीची अट रद्द करून 'लेक लाडकी' योजनेत एक मुलगा आणि एक मुलगी असेल तरीही मुलीला योजनेचा लाभ देण्याचं निश्चित करण्यात आलं. तसंच एक लाख उत्पन्न असलेल्या आणि पिवळ्या, केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये मिळणार : 'लेक लाडकी' योजनेच्या आधारे पुण्यात पहिल्या टप्प्यात 4 हजार 172 मुलींना पहिल्या टप्प्यातील 5 हजार रुपये वर्ग करण्याचं काम प्रशासनामार्फत सुरू आहे. 1 किंवा 2 दिवसांत प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यावर 5 हजार रुपयांचा पहिला हप्ता वर्ग करण्यात येणार आहे. यात पुणे शहरातील 750 लाभार्थ्यांना, तर ग्रामीण भागात सर्वाधिक जुन्नर तालुक्यातील 575 लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान देऊन लाभार्थी मुलीचं वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये दिले जातात.

योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे कराल अर्ज? : 'लेक लाडकी' योजना 1 एप्रिल 2023 नंतर जन्म झालेल्या मुलींसाठी असून या योजनेसाठी अर्ज राज्यात कुठेही आणि कधीही करता येतो. मुलीच्या जन्माची नोंदणी झाल्यानंतर अंगणवाडी सेविकेकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करता येतो. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून हा अर्ज ऑनलाइन भरला जातो आणि त्यानंतर ऑनलाइन पडताळणी झाल्यावर प्रत्यक्षात लाभ मिळण्यास सुरुवात होते. ही योजना मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, मुलींचा मृत्यू दर कमी करणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे आणि शाळाबाह्य मुलींची संख्या शून्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.

4 हजार 172 लाभार्थ्यांना मिळणार लाभ :योजनेच्या अंतर्गत कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर 6 हजार रुपये, सहावीत गेल्यावर 7 हजार रुपये, 11 वीत गेल्यावर 8 हजार रुपये आणि लाभार्थी मुलीला 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये, अशा रितीनं एकूण त्या मुलीस 1 लाख 1 हजार रुपये एवढा लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत आंबेगाव तालुक्यात 218, बारामती तालुक्यात 393, दौंड तालुक्यात 216, हवेली तालुक्यात 336, भोर तालुक्यात 67, इंदापूर तालुक्यात 548, जुन्नर तालुक्यात 575, खेड तालुक्यात 258, मावळ तालुक्यात 221, मुळशी तालुक्यात 78, पुरंदर तालुक्यात 240, शिरूर तालुक्यात 242, वेल्हे तालुक्यात 30 तसंच पुणे शहरामध्ये 750 असं मिळून एकूण 4 हजार 172 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

हप्ता वर्ग करण्याचं काम सुरु : याबाबत जिल्हा महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी जामसिंग गिरासे म्हणाले, " 'लेक लाडकी' या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या ही पडताळणी झाल्यानंतर निश्चित करण्यात आली आहे. मुलीच्या जन्मदारात वाढ होणं आणि शिक्षणापासून मुली वंचित राहू नये, हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. पहिल्या टप्प्यातील हप्ता वर्ग करण्याचं काम सुरु आहे."

हेही वाचा

  1. लोकसभेच्या मतांची आकडेवारी सांगत एकनाथ शिंदेंचा शरद पवारांवर पलटवार; म्हणाले, "जिथं जिंकता तिथं ईव्हीएम..."
  2. समाजवादी पक्ष भाजपाची बी टीम असल्यासारखं वागत आहे- आदित्य ठाकरे
  3. "ईव्हीएम हटाव चळवळ सुरू ठेवून न्यायालयीन लढा देणं महत्त्वाचं"-शरद पवार
Last Updated : Dec 10, 2024, 11:28 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details