मुंबईVijay Wadettiwar:विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी काही समाजकंटकांनी घातलेला हैदोस बघात कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकाला निलंबित करावे. तसेच स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांची तात्काळ बदली करावी. घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशा प्रकारची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
सरकारची प्रायोजित घटना :कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड प्रकरणी आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद पार पडली. यावेळी खासदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री नसीम खान, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते. वडेट्टीवार म्हणाले की, पुरोगामी विचारांच्या कोल्हापूर जिल्ह्यात पुरोगामी विचारांचा खासदार निवडून आल्याने जातीयवादी पक्षाच्या पायाखालची वाळू सरकलीय. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अशा घटना घडविल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आंदोलनाच्या नावाखाली विशालगड येथे तोडफोड करणारे शिवप्रेमी असू शकत नाही. त्यामुळे हे हल्लेखोर कोण होते? याचा सरकारने तपास करून मास्टरमाईंड शोधून काढावा.
पोलीस प्रशासनाची बघ्याची भूमिका? :विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, घटना घडत असताना पोलीस प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे पोलीस अधीक्षकांना निलंबित करून जिल्हाधिकाऱ्यांची बदली करावी. खुलेआम रवी पडवळ व्हिडिओ करून आव्हान देत आहे. त्याच्यावर कारवाई करा, अशी देखील मागणी त्यांनी केली आहे. अतिक्रमणाचा प्रश्न सरकारने सुसंवादातून सोडवला असता तर घटना घडली नसती. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना पत्र देखील लिहिले आहेत. तसेच त्यांची भेटीची वेळ देखील मागितली आहे. मतांवर डोळा ठेवून अशा प्रकारचं राजकारण राज्यात केलं जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.