मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीनं 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' जाहीर केली होती. या योजनेला महाराष्ट्रात अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे. तर महायुतीसाठी ही योजना गेमचेंजर ठरली आहे. प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होत आहेत. मात्र, आता या ऐतिहासिक योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणी निकषात बसत नाहीत, अशा पाच लाख महिलांना सरकारनं अपात्र ठरवलं आहे.
पाच लाख अपात्र लाडक्या बहिणी : या योजनेच्या निकषात बसत नाहीत, अशा ५ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली. "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना! दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'तून वगळण्यात येत आहे.
अपात्र यांची यादी पुढीलप्रमाणे :"संजय गांधी निराधार योजना - 2 लाख 30 हजार, ज्यांचे वय वर्ष 65 पेक्षा अधिक असलेल्या महिला - 1 लाख 10 हजार, कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला - १ लाख ६० हजार, एकूण अपात्र महिला - ५ लाख," अशी माहिती पोस्टमध्ये मंत्री अदिती तटकरेंनी दिली.
पुण्यातून ७५ हजार महिलांनी पैसे परत केले : विधानसभा निवडणुकीपूर्वी घाईगडबडीनं या योजनेतील महिलांना पात्र ठरवण्यात आलं होतं. त्यावेळी सरकारनं निकष पाहिले नाहीत. सरसकट अर्ज दाखल केलेल्या महिलांना त्यांच्या खात्यात पैसे जमा केले. मात्र आता निवडणुकीनंतर नियम आणि निकष पाहिले जात आहेत. मग त्यावेळी निकष का नाही पाहिले गेले? असा संतप्त सवाल लाडक्या बहिणी विचारत आहेत. दुसरीकडं, आपण योजनेचा लाभ घेतल्यामुळं सरकार आपल्यावर कारवाई करेल, या भीतीनं ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाहीत, अशा महिलांनी पैसे परत करण्यास सुरुवात केली. केवळ एका पुण्यामध्ये 75 हजार महिलांनी कारवाईच्या भीतीपोटी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'तील पैसे परत केले आहेत.
हेही वाचा -
- शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा, लाडकी बहीण योजना बंद होणार? जाणून घ्या कारणं...
- पुण्यात 75 हजारांहून अधिक महिलांच्या कुटुंबीयांच्या नावे चारचाकी; लाडक्या बहिणीला लाभ मिळणार का?
- ...तर 'लाडकी बहीण योजने'चा हप्ता होणार रद्द; लाडक्या बहिणींच्या घरी होणार तपासणी