अमरावती Kolkas Elephant Safari In Melghat : हत्ती पहायचा, हत्तीवर बसायचं आणि हत्तीवरुन जंगलाची सफारी करायची कोणाला हौस सगळ्यांना असते. मात्र हत्तीवर बसण्याचं स्वप्न अपूर्ण असेल त्यांच्यासाठी अमरावती जिल्ह्यात मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात येणारं कोलकास हे एकमेव हत्ती सफारीचं ठिकाण आहे. हत्तीवर बसून हलत-डुलत जंगल पाहण्याचा आगळावेगळा आनंद घेण्यासाठी मेळघाटातील कोलकास हे ठिकाण पर्यटकांचं खास पसंतीचं आहे.
चार पैकी एक हत्ती सेवानिवृत्त :कोलकास इथं जयश्री, सुंदरमला, लक्ष्मी आणि चंपाकली हे चार हत्ती आहेत. यापैकी जयश्री ही 80 वर्षाची झाली असून ती पर्यटकांना जंगल सफारीच्या सेवेतून निवृत्त झाली आहे. "या ठिकाणी दहा किलो कणिक त्यामध्ये अर्धा किलो गूळ, अर्धा किलो तेल आणि अर्धा किलो मीठ टाकून एका मोठ्या कोपरामध्ये मोठी पोळी केली जाते आणि ती रोज एका हत्तीला दिली जाते. एकूण चार हत्तींच्यासाठी अशीच व्यवस्था केली जाते. एका हत्तीवर महिन्याला 25 हजार पाचशे रुपये खर्च येतो," अशी माहिती व्याघ्र प्रकल्पाच्या वतीनं या हत्तींच्या व्यवस्थापनासाठी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी शेखलाल धाराशिंबे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
प्रत्येक ऋतूत वेगळा अनुभव :कोलकास इथं सकाळी नऊ ते बारा आणि दुपारी तीन ते सायंकाळी पाच वाजतापर्यंत एका हत्तीवर चार जणांना सफारीसाठी नेले जाते. अर्धा तासाच्या या जंगल सफारी दरम्यान घनदाट जंगलातून हत्ती सफारीचा आनंद पर्यटक घेतात. आता उन्हाळ्यात पानगळ झाल्यामुळं हत्ती सफारीचा आगळावेगळा फील येतो. जंगल ओसाड असल्यामुळं चितळ, रानगवे आणि नशीब बलवत्तर असेल तर वाघाचं दर्शन देखील या हत्ती सफारीदरम्यान पर्यटकांना घडते. पावसाळ्यात हत्ती सफारीचा सर्वाधिक आनंद पर्यटक लुटतात. जंगलात काही ठिकाणी मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी आणि चिखल राहत असल्यामुळे अशा भागातून हत्ती गेला तर हत्तीवर बसणारे पर्यटक कधी आडवे होतात तर चिखलात फसलेला पाय हत्ती बाहेर काढतो, त्यावेळी एका बाजूनं खालून वर झटक्यानं येण्याचा थरारक अनुभव देखील पर्यटकांना येतो.
हत्तींना आंघोळ घालण्याचीही पर्यटकांना संधी :हत्ती सफारीसाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वतीनं चार व्यक्तींसाठी आठशे रुपये दर आकारण्यात येत आहे. यासोबतच दुपारी अडीच ते तीन दरम्यान लगतच्या सिपना नदीत हत्ती आंघोळीला जातात, त्यावेळी पर्यटकांना हत्तींची आंघोळ घालायची असेल, तर प्रति व्यक्ती 25 रुपये द्यावे लागतात. यासह सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान आपल्या हातानं हत्तीला खाऊ घालायचं असेल, तर पर्यटकांना प्रति व्यक्ती 25 रुपये देऊन हत्तीला आपल्या हातानं भरवण्याची संधी मिळते.