महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोष्ट एका समुद्रात बुडालेल्या सर्कसची; जाणून घ्या 'कार्लेकर ग्रँड सर्कस'चा इतिहास - KARLEKAR GRAND CIRCUS

अलीकडच्या काळात सर्कस हा प्रकार खूप कमी झालाय. देश स्वतंत्र होण्यापूर्वी जगभर प्रसिद्ध असलेल्या 'कार्लेकर ग्रँड सर्कस'चा इतिहास जाणून घेणार आहोत.

Karlekar Grand Circus
कार्लेकर ग्रँड सर्कस (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 17, 2025, 5:13 PM IST

Updated : Feb 18, 2025, 7:28 PM IST

अमरावती : वाघ, हत्ती, घोडे, सिंह असे प्राणी ‌असणारी सर्कस पाहणारी पिढी सध्या हयात आहे. भारतील एक सर्कस ‌देश स्वतंत्र होण्यापूर्वी जगभर प्रसिद्ध होती. तब्बल साठ वर्ष ही सर्कस सुरू असताना एक दिवस अचानक ही संपूर्ण सर्कस समुद्रात बुडाली. 'कार्लेकर ग्रँड सर्कस' असं या सर्कसचं नाव आहे. कार्लेकर यांच्या कुटुंबातील 77 वर्षीय सदस्य चंद्रकांत कार्लेकर आपल्या कुटुंबाच्या मालकीची असणारी जगप्रसिद्ध कार्लेकर ग्रँड सर्कसबाबत आज देखील मोठ्या अभिमानानं बोलतात. अमरावतीत एका सत्संगात सहभागी होण्याकरिता आलेले चंद्रकांत कार्लेकर यांनी ‌"ईटीव्ही भारत" शी संवाद साधला. त्यांनी समुद्रात बुडालेल्या आपल्या सर्कसची गोष्ट सांगितली. यासोबतच सर्कसमधले अनेक प्रसंग जे त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले होते यावर देखील त्यांनी प्रकाश टाकला.



कार्लेकरांच्या सर्कसचा इतिहास : "कार्लेकर ग्रँड सर्कसची स्थापना सांगलीत शंकरराव कार्लेकर यांनी‌ 1883 मध्ये केली. या सर्कसमध्ये चीन, जपान आणि नेपाळ या देशातले कलाकार होते. हे सर्व कलाकार आपल्या कुटुंबासोबतच ग्रुपमध्ये यायचे. ते कुटुंबासह टेंटमध्ये राहायचे. हे सर्व कलाकार चित्तथरारक खेळ सादर करत. डोळ्यावर पट्टी बांधून गाडी चालवणं, मौत का कुवा‌ आणि नेमबाजीमध्ये हे कलाकार तरबेज होते. शिवाजीराव कार्लेकर हे सर्कसमध्ये शक्तीचे प्रदर्शन करायचे. अजिंक्य मल्ल राजा राममूर्ती हे खिळाच्या पाटावर झोपून छातीवर हत्ती उभा करायचे. ज्योतीराम मोहिते हे रिंग मास्टर होते. यासोबतच स्त्रीमल्ल देखील सर्कसमध्ये होत्या. त्या काळात कार्लेकर ग्रँड सर्कस ही भारतातच नव्हे तर परदेशात देखील प्रसिद्ध होती. अनेक देशांमध्ये आमच्या सर्कसचे खेळ चालायचे. त्या काळात परशुराम माळी यांची लॉयन सर्कस, सांगलीचीच देवल सर्कस, मिरज येथील छत्रेंची सर्कस, वालवलकरांची ग्रेट रॉयल सर्कस आणि पुढे बॉम्बे सर्कस या प्रसिद्ध होत्या". अशी माहिती चंद्रकांत कार्लेकर यांनी दिली.

प्रतिक्रिया देताना चंद्रकांत कार्लेकर (ETV Bharat Reporter)



जंगली प्राणी सर्कसचा आधार: "सर्कसमध्ये असणारे जंगली प्राणी हेच सर्कसमधले खरे आकर्षण होते आणि या प्राण्यांचा सर्कसला खरा आधार होता. त्या काळात आमच्या सर्कसला राजाश्रय होता. आमच्या सर्कलमध्ये 40 वाघ, 25 सिंह, 25 हत्ती, 25 घोडे असे प्राणी होते. त्या काळात सर्कसला चांगला राजाश्रय मिळायचा. त्यावेळी काही राजांनी स्वतःजवळचे वाघ, सिंह, घोडे माझ्या आजोबांना आणि वडिलांना सर्कससाठी दिले होते. नागपूरच्या रघुजी राजे भोसले यांनी दोन सिंह दिले होते. बडोद्याच्या गायकवाड राजांनी देखील सिंह दिला होता. त्या काळात जंगली प्राण्यांना सर्कसमध्ये घेण्यास कोणाच्या परवानगीची गरज भासत नव्हती", असं देखील चंद्रकांत कार्लेकर म्हणाले.

कार्लेकर ग्रँड सर्कस मधील हत्ती (ETV Bharat Reporter)



सर्कस पाहायला शेतकरी आला बैल घेऊन : "अमरावतीला लाल शाळेच्या मैदानावर ‌आमची सर्कस होती. त्यावेळी एक शेतकरी चक्क आपला बैल घेऊन सर्कस पाहायला आला होता. सर्कशीतले प्राणी कसे खेळ दाखवतात हे बैलालाच कळायला हवं असा त्याचा उद्देश होता. आमच्या माणसांनी त्याला बाहेर अडवलं. त्यानं बैलाच्या तिकिटाचे पैसे घ्या, मात्र बैलाला सर्कस पाहायला आतमध्ये जाऊ द्या, अशी विनंती केली होती. त्यावेळी आमच्या माणसांनी त्याला बैलासह सर्कस पाहू दिली. ही अतिशय गमतीशीर आठवण माझ्या वडिलांनी आमच्या सर्कस संदर्भात लिहिलेल्या पुस्तकात नमूद केली. त्यावेळी अमरावती शहरातील प्रसिद्ध श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मदतीकरता माझ्या आजोबांनी एक दिवसाच्या सर्व प्रयोगांचा निधी दिला होता", असं देखील चंद्रकांत कार्लेकर यांनी सांगितलं.

'कार्लेकर ग्रँड सर्कस मधील देखावा (ETV Bharat Reporter)



सर्कसमधल्या अजगरानं‌‌ गिळला माणूस : "आपल्या सर्कसमध्ये घडलेले विविध किस्से सांगताना एकदा सर्कसमध्ये असणाऱ्या अजगरनं चक्क आमच्या सर्कसमध्ये‌ काम करणारा नंजप्पा नावाच्या माणसाला गिळलं होतं हा थरारक किस्सा चंद्रकांत कार्लेकर यांनी सांगितला. त्यावेळी अजगराचं पोट ज्या ठिकाणी फुगलं होतं ते ठिकाण सर्कसमधल्या आमच्या इतर सहकाऱ्यांनी चाकूनं फाडून नंजप्पाला बाहेर काढलं होतं. नंजप्पा त्यानंतर बरेच दिवस जिवंत होता", अशी ही आठवण ‌कार्लेकर यांनी सांगितली.

कार्लेकर ग्रँड सर्कस फोटो (ETV Bharat Reporter)


असा झाला सर्कसचा अंत : ब्रह्मदेशची राजधानी रंगून येथे 1943 मध्ये सर्कसचे खेळ होणार होते. त्यामुळं आमची सर्कस समुद्रमार्गे ‌जाहजातनं जात ‌असताना समुद्रात‌ मोठी‌‌ लाट आली आणि ‌त्या लाटेत‌‌ जहाज‌ बुडालं. जहाजामध्ये असणारे सगळे प्राणी बुडाले. काही माणसं बुडालीत. या दुर्दैवी घटनेनंतर आमची कार्लेकर ग्रँड सर्कस बंद झाली. 1883 ते ‌1943 अशी 60 वर्ष आमची कार्लेकर ग्रँड सर्कस जगभर प्रसिद्ध होती. मात्र, समुद्रात आलेल्या लाटेमुळं आमची सर्कस बुडाली. आमच्या सर्कशीच्या आठवणीत माझे वडील शिवाजीराव कार्लेकर यांनी आठ पुस्तक लिहिलीत. या पुस्तकात आमच्या कुटुंबाच्या सर्कसचा इतिहास‌ कळतो, असं चंद्रकांत कार्लेकर म्हणाले.

कार्लेकर ग्रँड सर्कस फोटो (ETV Bharat Reporter)



शाहरुख खान सर्कस मुळेच झाला मोठा : चित्रपट अभिनेता म्हणून शाहरुख खान आज मोठा कलावंत आहे. शाहरुख खान यांना सर्वात आधी सर्कस नावाच्या सिरीयलमध्ये काम केलं. सिरीयलमधली ती सर्कस माझ्या मित्राचे वडिल‌ जे मूळ केरळचे असणारे साहदेवन यांची अपोलो सर्कस होती. विशेष म्हणजे एकेकाळी हे सहादेवन‌ आमच्या कार्लेकर ग्रँड सर्कसमध्ये काम करत होते. त्यावेळी शाहरुख खान सोबत झालेली ओळख आज देखील कायम आहे, असं चंद्रकांत कार्लेकर म्हणाले.

हेही वाचा -

  1. 'सुर्यवंशी'च्या यशानंतर रोहित शेट्टीने सांगितला 'सर्कस' रिलीजचा प्लान
  2. डिजिटल शोसह मनोरंजनासाठी सज्ज झाली 'रॅम्बो सर्कस'!
Last Updated : Feb 18, 2025, 7:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details