छत्रपती संभाजीनगर : 'मूर्ती लहान कीर्ती महान' असे एक उदाहरण शहरात पाहायला मिळतंय. वय वर्ष अवघे चार असलेल्या चिमुकलीनं स्वत:च्या नावावर 5 विश्वविक्रम केले आहेत. कनक मुंदडा असं तिचं नाव आहे.आता या वयात कोणते विक्रम आहेत? असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. या चिमुकलीनं वेगवेगळ्या प्रकारात आपल्या बुद्धीची चुणूक दाखवलीय. बालपणापासून आई-वडिलांनी अभ्यासात निर्माण केलेल्या रुचीमुळं तिनं हा पल्ला गाठला. घरात टीव्ही, मोबाईलचा वापर न करता, पुस्तक आणि कथांना प्राधान्य दिल्यानं चिमुकलीनं विक्रमाला गवसणी घातलीय.
कनक मुंदडा, प्रदीप मंदडा, ममता मुंदडा यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter) 5 विक्रम केले नावावर :"बाळाचे पाय पाळण्यात दिसतात," अशी म्हण आपल्या नेहमी कानी पडते. या म्हणीला साजेशी असलेल्या चार वर्षीय कनकनं 5 वेगवेगळे विश्वविक्रम आपल्या नावावर केले आहेत. अत्याधुनिक, यांत्रिकी जगात लहान मुलांच्या हाती मोबाईल आले आहेत. मात्र, लहानपणापासून घरातील पोषक वातावरण असल्यानं या चिमुकलीला अभ्यासात अधिक रस आहे. चिमुकली अवघी चार वर्षाची असताना तिनं पाच विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्यामुळं मुंदडा कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केलाय.
हे आहेत पाच विश्वविक्रम
- 18 महिने वय असताना तिला अंक अक्षर, हिंदी वर्णमाला, प्राणी, पक्षी, रंगांची ओळख झाली होती. त्यामुळे तिनं डॉ. कलाम वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पहिला विक्रम नोंदवला.
- चिमुकली वीस महिन्याची असताना 22 देशाचे झेंडे, 27 स्वातंत्र्य सैनिकांचे फोटो पाहून तिनं नावं ओळखल्यानं इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं.
- 2 वर्षांची असताना तिनं 1 मिनिटात शरीरातील 22 अवयव ओळखून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं.
- अडीच वर्षांची असताना पन्नास सेकंदात भारतातील 28 राज्याच्या राजधानी तोंडपाठ असल्यामुळं OMG बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिची नोंद झाली.
- साडेतीन वर्षांची असताना 1 मिनिट 30 सेकंदात 65 देशाच्या राजधानी ओळखून तिनं वर्ल्ड वाईल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव कोरलंय.
रोज असतो वेगवेगळा अभ्यास करण्याचा ध्यास : लहान मुलांना आई वडील सांगतात तसं मुल-मुली करतात. मात्र, कनकच्या आई-वडिलांना अभ्यासक्रमाबरोबर इतर उपक्रम घ्यावे लागतात. रोज सकाळी लवकर उठून ती शाळेची तयारी करते. शाळेतून घरी आल्यावर ती शाळेचा अभ्यास करते. "बाहेर खेळण्यापेक्षा काही तरी नवीन शिकणारा उपक्रम घेण्याची ती अट्टहास धरते," असं तिच्या पालकांनी बोलताना सांगितलंय. "थोडावेळ मैत्रिणीसोबत खेळल्यानंतर ती रात्री झोपताना आईला एक गोष्ट सांगण्याचा हट्ट करते. तिची आई एखाद्या पुस्तकातील छानशी कथा तिला ऐकवते. आमच्या घरात टीव्ही तसंच मोबाईलचा वापर कमी केला जातो. त्यामुळं तिच्यात असलेली हुशारी ओळखणं सोपं झाले," असे कनकची आई ममता मुंदडा यांनी सांगितलं. "घरात मुलांना पोषक वातावरण दिलं, तर लहान मुलंदेखील मोठी झेप घेऊ शकतात," असा विश्वास मुंदडा कुटुंबीयांनी व्यक्त केला.