पिंपरी : जगविख्यात पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या नावाने मिळणारा 'आशा भोसले पुरस्कार 2024' पुरस्कार हा माझ्यासाठी खूप मोठा आहे. आशाताईंच्या नावाचा पुरस्कार मला मिळेल असं कधीही वाटलं नव्हतं, सर्व सन्मान एकीकडे आणि हा पुरस्कार एकीकडे इतकं या पुरस्काराचे माझ्यासाठी महत्त्व आहे. अशी भावना प्रसिद्ध पार्श्वगायक शांतनु मुखर्जी उर्फ शाननेव्यक्त केली आहे.
असं आहे पुरस्काराचं स्वरूप : सन्मान चिन्ह, 1 लाख 11 हजार रुपये रोख, शाल असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. पुरस्काराचं यंदा 20 वं वर्ष आहे. दरवर्षी देश पातळीवर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संगीत क्षेत्रातलम्या प्रतिभावंताला हा पुरस्कार दिला जातो. काल रविवारी (दि. 11 फेब्रुवारी)रोजी भोईरनगर येथे संपन्न झालेल्या या पुरस्कार सोहळ्यासाठी ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या मान्यवरांना दिला आहे पुरस्कार : 'गानसम्राज्ञी' लता मंगेशकर, खय्याम, रवींद्र जैन, भप्पी लहरी, प्यारेलालजी, आनंदजी, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अनु मलिक, शंकर महादेवन, पंडित शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर, हरीहरन, सोनू निगम, सुनिधी चौहान, पद्मभूषण उदित नारायण, रुपकुमार राठोड, अवधूत गुप्ते आणि सलील कुलकर्णी आदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
चार वर्ष वय असताना गायनाला सुरुवात :शानच्या घरात सुरुवातीपासूनच संगीतमय वातावरण असल्याने लहानपणापासूनच त्यांचा संगीताकडे कल होता. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी त्याने गायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात शान जाहिरातींसाठी जिंगल्स गात होते. शान 13 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या मृत्यूनंतर, शानची आई संगीताच्या दुनियेत सक्रिय झाली, ज्यामुळे त्यांच्या घराचा आर्थिक डोलाराही सावरला. शान यांनी लहानपणापासूनच जाहिरात चित्रपटांसाठी जिंगल्स गाण्यास सुरुवात केली. वयाच्या 17 व्या वर्षी त्याने पहिल्यांदा चित्रपटात गाणं गायलं.