छत्रपती संभाजीनगर Tanisha Bormanikar: आज 'आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन' (International Chess Day 2024) आहे. कुटुंबीयांनी साथ दिली तर लहान वयात देखील यशाचे शिखर गाठता येते. मात्र, त्यासाठी जिद्द आणि चिकाटी लागते याचे उदाहरण म्हणजे जिल्ह्यातील जगप्रसिद्ध असलेली बुद्धिबळ पटू तनीषा बोरमणीकर. तिला वयाच्या सहाव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळायची गोडी लागली, सातव्या वर्षात थेट राष्ट्रीय स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली. अन् तनीषाने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं प्रतिनिधित्व करण्यापर्यंत मजल मारली. आतापर्यंत तिने २० आंतरराष्ट्रीय, ३० राष्ट्रीय, ४० राज्यस्तरीय स्पर्धा खेळल्या असून अनेक ठिकाणी ती अजिंक्य राहिली आहे.
लहानपणापासून तनीषा खेळते बुद्धिबळ : तनीषा वयाच्या सहाव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळते. तिच्या मामाचा मुलगा खेळत असताना त्याला पाहून तिला रुची वाढली. एक दोनदा खेळल्यानंतर रस वाढला आणि तिची आवड पाहून पालकांनी खासगी शिकवणी सुरू केली. पहिली स्पर्धा खेळली आणि तिने दुसरा क्रमांक पटकावला. त्यामुळं आत्मविश्वास अधिक वाढला. सातवीमध्ये असताना राज्यस्तरीय स्पर्धा खेळली आणि त्यावेळी राष्ट्रीय स्तरावर खेळायला संधी मिळाली. उझबेकिस्तान येथे २०१४ मध्ये पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली आणि तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळाले. २० आंतरराष्ट्रीय स्पर्धा, ३० राष्ट्रीय, ४० राज्यस्तरीय स्पर्धा खेळल्या. कधी यश तर कधी अपयश आल्यावर काय चुकते, त्याकडं लक्ष दिलं. जिद्दीने चुका टाळण्यासाठी प्रयत्न केले आणि कमी वयात बुद्धिबळ खेळात पारंगत होत ती '६४ घरांची राणी' झाली.
खेळताना करते प्रतिस्पर्धी खेळाडूचा अभ्यास :कुठलाही खेळ खेळताना पूर्वतयारी ही करावीच लागते, तशीच तयारी तनीषाने देखील प्रत्येकवेळी केली. स्वतःचा खेळ कसा असावा यावर तिनं लक्ष केंद्रित केलं, मात्र त्याचबरोबर प्रतिस्पर्धी असलेले खेळाडू कशा पद्धतीने खेळतात, त्यांची रणनीती कशी असते. यावर देखील तिने लक्ष केंद्रित केलं. त्यामुळं समोरची व्यक्ती खेळताना आपली कशा पद्धतीने रणनीती असावी याबाबत योग्य मांडणी करून ती सराव करते, त्यातूनच तिला यश मिळत गेले. यापुढे काय करायचं त्यापेक्षा आता जो खेळ आहे तो १०० टक्के प्रयत्न देऊन खेळायचा हे तत्व तिने अवलंबले. त्यामुळंच आज मोठ्या यशाच्या शिखरावर ती जाऊन पोहोचली आहे. आगामी काळात वेगवेगळ्या मोठ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन देशासाठी खेळायचं असा मानस तनीषानं व्यक्त केला आहे.