मुंबई : देशासाठी आदर्श व्यक्तिमत्व, शालिन उद्योगपती अशी ओळख असलेल्या रतन टाटा (Ratan Tata Passed Away) यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. टाटा ग्रुपचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत ही अधिकृत माहिती दिली. रतन टाटा यांच्या निधनाच्या वृत्तामुळं संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांसारख्या अनेक दिगज्जांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? : पंतप्रधान मोदी आपल्या पोस्टमध्ये म्हणालेत की, "रतन टाटा यांच्याशी झालेल्या असंख्य संवादांनी माझं मन भरून आलंय. मी मुख्यमंत्री असताना त्यांना गुजरातमध्ये वारंवार भेटत असे. आम्ही विविध मुद्द्यांवर विचार विनिमय करत होतो. मी दिल्लीत आलो तेव्हाही आमच्यातील संवाद सुरूच होते. त्यांच्या निधनानं अत्यंत दु:ख झालंय."
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही वाहिली श्रद्धांजली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू एक्सवर पोस्ट करत म्हणाल्या, "रतन टाटा यांच्या दुःखद निधनानं, भारतानं कॉर्पोरेट वाढीला, राष्ट्र उभारणीत आणि नैतिकतेसह उत्कृष्टतेचे मिश्रण करणारा एक आयकॉन गमावलाय. पद्मविभूषण आणि पद्मभूषण मिळवणारे, टाटांचा महान वारसा पुढं घेऊन जाणाऱ्या रतन टाटा यांनी जागतिक स्तरावर एक वेगळी प्रतिमा निर्माण केली. त्यांनी अनुभवी व्यावसायिक तसंच तरुण विद्यार्थ्यांना नेहमीच प्रेरणा दिली. परोपकार आणि परोपकारासाठी त्यांचं योगदान अमूल्य आहे. मी त्यांच्या कुटुंबियांना, टाटा समूहाच्या संपूर्ण टीमला आणि जगभरातील त्यांच्या चाहत्यांना माझ्या संवेदना व्यक्त करते."
अमित शाह यांनी व्यक्त केली हळहळ : "प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानं मी खूप दु:खी झालोय. त्यांनी नि:स्वार्थपणे आपलं जीवन आपल्या देशाच्या विकासासाठी समर्पित केलं. मी प्रत्येकवेळी त्यांना भेटलो तेव्हा त्यांचा उत्साह दिसून आला. देश आणि देशातील लोकांच्या कल्याणासाठी त्यांची वचनबद्धता मला चकित करून गेली", असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले.
दुर्मिळ रत्न हरपले :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले, "नैतिकता आणि उद्यमशीलता यांचा अपूर्व आणि आदर्श संगम रतनजी टाटा यांच्या ठायी होता. सुमारे 150 वर्षांची श्रेष्ठत्व आणि सचोटीची परंपरा असलेल्या टाटा ग्रुपची जबाबदारी यशस्वीरित्या पेलणारे रतनजी टाटा हे एक जिवंत आख्यायिका होते. त्यांनी वेळोवेळी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कणखरपणी टाटा ग्रूपला वेगळ्या औद्योगिक उंचीवर घेऊन गेला. त्यांना मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. रतनजी टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील."