जालनाIncome Tax Raid in Jalna :जालना शहरातील औद्योगिक वसाहतीत अनेक कंपन्यांवर प्राप्तिकर विभागानं छापेमारी सुरु केलीय. शहरातील 3 ते 4 स्टील उद्योजकांच्या घरी आणि एमआयडीसीत हे धाडसत्र सुरू राहिल. नाशिक, पुणे आणि मुंबई येथील पथकाकडून हे धाडसत्र सुरू करण्यात आलं. जालन्यातील अनेक औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांवर गुरुवारी सकाळपासून छापा टाकून चौकशी करण्यात आली. प्राप्तिकर विभागाच्या पथकाकडून अभिलेखांची तपासणी करण्यात आली. या कारवाईमुळं शहरात एकच खळबळ उडालीय. प्राप्तिकर विभागानं जालन्यातील एमआयडीसीतील कंपन्यांवर अचानक धाडसत्र सुरु केल्यानं स्टील उद्योजकांचे धाबे दणाणले आहेत.
सकाळपासून छापेमारी : गुरुवारी सकाळपासून सुरू असलेली कारवाई रात्री उशिरापर्यंत राहिली. स्टील उद्योजकांच्या घरी पथकानं धाडी टाकल्या असून विविध अभिलेखांची तपासणी करण्यात आली. शहरातील नामांकित स्टील उद्योजकांच्या घरी प्राप्तिकर विभागाच्या तब्बल 200 जणांच्या पथकाकडून सकाळी धाड टाकण्यात आलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या जमा- खर्चाच्या व्यवहारात काही संशयास्पद बाबी आढळून आल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र आतापर्यंत कारवाईत नेमकं काय काय मिळून आलं याची अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.