मुंबई - गेल्या काही दिवसांपासून मुंबईत आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालीय.मुंबईतील चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनी येथे आज पहाटे भीषण आग लागली असून, या आगीत एकाच गुप्ता कुटुंबातील सात जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तसेच दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमींवर वाडिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या आगीच्या घटनेनंतर परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येतोय. दरम्यान, या घटनेचा आढावा आणि माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी मृतकाच्या कुटुंबीयांना मदतीची घोषणा केलीय.
मृतकांना पाच लाखांची मदत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आग लागलेल्या दुकानाच्या ठिकाणी दाखल होत घटनेची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार राहुल शेवाळे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. आग कशी लागली आणि आगीला कारण काय? अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. दरम्यान, दुकानावर रॉकेल विक्री होत होती आणि रॉकेलच्या भडका उडल्यामुळं आग लागल्याची प्राथमिक माहिती स्थानिकांची दिलीय. त्यामुळं गुप्ता या एकाच कुटुंबातील सात जणांचा दुर्दैवी होरपळून मृत्यू झालाय. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. परंतु आगीच्या दुर्घटनेमुळे गुप्ता कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. गुप्ता कुटुंबाच्या पाठीमागे सरकार ठामपणे उभे आहे. जे जखमी आहेत, त्यांना सरकारकडून उपचार देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक मृतकाच्या पाठीमागे पाच लाखांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
उच्चस्तरीय चौकशी होणार: पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबईत अशा आगीच्या घटना वारंवार घडतात. त्या आगीच्या घटना घडू नये, यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच एकाच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय हे अतिशय दुर्दैवी आहे. अशा घटना घडू नये, यासाठी शासन आणि प्रशासन काम करणार आहे. परंतु ही आगीची घटना नेमकी कशी लागली? याला कारण काय? याचीही उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिलंय.
हेही वाचाः