नाशिक (इगतपुरी)Igatpuri Water Shortage:महाराष्ट्राची पॉंडिचेरी म्हणून इगतपुरी तालुक्याची ओळख आहे. या भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस होत असतो; मात्र यंदा जून महिन्याच्या अखेरीस पावसानं ओढ दिल्यानं येथील नागरिकांना पाण्यासाठी वनवन करावी लागत आहे. या भागातील सर्वच विहिरींनी पाण्याविना तळ गाठला असून, हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना जीव धोक्यात घालून विहिरीत उतरून संघर्ष करावा लागत आहे. तरी सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही अशा भावना येथील नागरिकांनी व्यक्त केल्या.
प्रशासनाने जागे होऊन तहान भागवावी :नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील शिदवाडी येथे भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या भागात पाणी टंचाईच्या झळा बसत असून गावाला पाणी पुरवठा करणारी विहिर जानेवारी महिन्यातच आटली होती. प्रशासनाने मोजकेच पाण्याचे टँकर दिले होते; मात्र गेल्या अनेक दिवसांपासून टँकरही आले नाही. तसेच अजूनही तालुक्यात पाहिजे तसा पाऊस पडला नाही. पावसाने अनेक भागात पाठ फिरवली आहे. याही आदिवासी गावात हीच परिस्थिती आहे; त्यामुळे येथील नागरिकांना तळ गाठलेल्या विहिरीत जीवावर उदार होऊन घोटभर पाण्यासाठी उतरावे लागत असून ओंजळीने पाण्याच्या डबक्यात पाणी भरून आपली तहान भागवावी लागत आहे. प्रशासनाने आता तरी जागे होऊन या आदिवासी बांधवांची तहान भागवावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.