मुंबई Human Finger Inside an Ice cream :आईस्क्रीममध्ये सापडलेल्या मानवी बोटाच्या प्रकरणाचा मुंबई पोलिसांनी छडा लावला आहे. आईसक्रीमचं पॅकिंग करताना अपघातात बोटाचा काही भाग गमावलेला कर्मचारी मालाड पोलिसांना सापडला आहे. 'यम्मो आईस्क्रीम' कंपनीविरोधात भारतीय दंड संविधान कलम 272 ,273 आणि 336 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मालाडमधील डॉक्टरांनी ऑनलाईन मागवलेल्या बटरस्कॉच आईस्क्रीमच्या कोनमध्ये सापडलेला मानवी बोटाचा तुकडा हा पुण्यातील आईस्क्रीम बनविणाऱ्या कारखान्यात काम करणारा कामगार ओंकार पोटे (वय २४) याचा असल्याचं उघड झालं आहे. कारखान्यात काम करताना अपघात होऊन कामगाराने उजव्या हाताच्या मधल्या बोटाचा तुकडा पडल्याचे प्राथमिक पोलीस चौकशीत समोर आले आहे. पुण्यातील इंदापूर येथील फॉर्च्युन डेअरी कारखान्यात ओंकार पोटे हा एप्रिल महिन्यात सहायक पॅकिंग मॅनेजर म्हणून रुजू झाला. ११ मे च्या सकाळी पॅकिंग विभागामध्ये काम करत असताना अपघात होऊन त्याच्या मधल्या बोटाचा वरचा भाग कापला गेला. या घटनेने कारखान्यात एकच खळबळ उडाली. कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी जखमी अवस्थेतील ओंकारच्या बोटावर उपचार केले. मात्र त्याचा तुटलेला बोटाचा तुकडा सापडला नव्हता.
कर्मचाऱ्याची डीएनए चाचणी: जवळपास महिन्याभरापूर्वी आईस्क्रिम पॅकेजिंग करताना कर्मचाऱ्याचा अपघात झाला होता. त्यावेळी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानं उजव्या हाताच्या मधल्या बोटाचा अर्धा भाग गमावला होता. त्यामुळं पोलिसांना संशय आला होता की, आईस्क्रीममध्ये आढळून आलेलं बोट हे याच कर्मचाऱ्याचं असावं. त्यामुळं पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्याची डीएनए चाचणी केली. रिपोर्ट तापासणीसाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला पाठवले. हे रिपोर्ट आल्यानंतर कंपनीतील कर्मचाऱ्याचं बोट आहे की नाही, हे सत्य समोर येणार आहे.
नेमकं काय घडलं होतं :मालाड येथील एका डॉक्टरनं ऑनलाईन डिलिव्हरी अॅपवरून आईस्क्रीमचे कोन मागवले होते. त्यांनी तीन आईस्क्रीमचे कोन ऑर्डर केले होते. त्यातील एक बटर स्कॉच होते. आईस्क्रीम खाताना तोंडात साधारण दोन सेंटीमीटर लांब अवशेष त्यांना जाणवले. तोंडातून बाहेर काढून बघितलं असता तो मासांचा तुकडा असल्याचं त्यांना लक्षात आलं. त्यानंतर त्यानी पोलिसात तक्रार दाखल केली होती. आईस्क्रीमची तपासणी फॉरेन्सिक लॅबमध्ये करण्यास पाठविण्यात आली. पोलिसांनी बोट कामगारचं असावं अशी शक्यता व्यक्त केली होती.
- नागरिकांनी घ्यावी काळजी :ऑनलॉईन मागवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थासंबंधीत अनेक घटना समोर येत आहेत. महागड्या कंपन्यांच्या चॉकलेटमध्ये अनेकदा अळ्या आढळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळं ऑनलाईन अन्नपदार्थ ऑर्डर करताना नागरिकांनी काळजी घ्यावी.
हेही वाचा
- आईस्क्रीममध्ये सापडलं चक्क माणसाचं बोट, मालाड पोलिसांनी कंपनीविरोधात दाखल केला गुन्हा - HUMAN FINGER INSIDE IN ICE CREAM
- बाजारात विकले जातंय भेसळयुक्त प्लास्टिकचं तांदूळ, 'या' टिप्सचा वापर करून भेसळीपासून वाचवा आरोग्य - Tips To Test Fake Rice