अमरावती : सातपुडा पर्वत रांगेतील घनदाट जंगलात वसलेल्या मेळघाटात अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक रहस्यं दडली आहेत. मेळघाटाच्या पायथ्याशी असलेल्या धामणगाव गढी गावात पांढऱ्या मातीनं उभारण्यात आलेली भव्य गढी अशाच इतिहासाची साक्षीदार आहे. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी या गढीमध्येच संपूर्ण गाव वसलं होतं, अशी माहिती असून या गढीचा नेमका इतिहास मात्र पांढऱ्या मातीत दडला आहे.
अशी आहे गढी :अचलपूर तालुक्यात मेळघाटच्या अगदी पायथ्याशी असणाऱ्या धामणगाव गढी या गावात पांढऱ्या मातीची भव्य गढी आज जीर्ण अवस्थेत पाहायला मिळते. पूर्वी चार बुरुज असणाऱ्या या गढीचे आज तीन बुरुज ढासळलेल्या अवस्थेत आहेत. सुमारे चार एकर जागा या गढीच्या आतमध्ये असून दीडशे वर्षांपूर्वी या गढीमध्ये एक छोटंसं गाव वसलं होतं. या गढीच्या आतमध्ये एकूण चार विहिरी असून यातील एकच विहीर पाहायला मिळते, तर तीन विहिरी बुजल्या आहेत. या गढीचं वैशिष्ट्य म्हणजे या गढीवरून थेट चिखलदरा येथील उंच पहाडावर वसलेला गाविलगड किल्ला दिसतो. पूर्वी गाविलगड किल्ल्यावरून दुर्बिणीद्वारे या गढीवर लक्ष ठेवलं जायचं, असं स्थानिक रहिवासी सांगतात.
पांढऱ्या मातीनं उभारण्यात आलेली गढी (Source - ETV Bharat Reporter) गढीचं वैशिष्ट्य काय? : "सुमारे चार एकर परिसरात असणाऱ्या या गढीला एक मुख्य भव्य प्रवेशद्वार होतं. आजही या प्रवेशद्वाराची जागा शाबूत आहे. गढीच्या चारही बाजूंनी भव्य भिंती उभारण्यात आल्या होत्या, एकूण चार बुरुज या गढीला होते. बाहेरून येणाऱ्या शत्रूंवर गढीच्या उंच भिंतीवरून गरम पाण्याचा मारा करता यावा, यासाठी विशिष्ट असं छिद्र करून त्यामध्ये पाईप बसवण्यात आले होते, आज देखील या गढीच्या उंच भिंतीवर गरम पाण्याचा मारा करणारी छिद्रं आणि पाईप आढळतात. गाविलगड किल्ल्यावर गोंड राजाचं राज्य असताना या गढीवर त्यांचे सरदार राहायचे. पुढे गाविलगड किल्ल्यावर अहमदनगरची निजामशाही त्यानंतर दिल्लीचे मुघल, हैदराबादचे निजाम आणि पुढे इंग्रजांची सत्ता आल्यावर त्या त्या सत्ताधीशांचे सरदार पैसे वसूली करण्यासाठी आणि बाहेरून येणाऱ्या शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी या गढीवर राहायचे," असं इतिहास अभ्यासक प्राध्यापक डॉ. वैभव मस्के यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
प्लेगच्या साथीमुळं गढीजवळ आलं धामणगाव : "फार पूर्वी धामणगाव गढी या ठिकाणी केवळ गढी होती. दीड दोनशे वर्षांपूर्वी फाटकर कुटुंबाकडे या गढीची मालकी होती. 1896 मध्ये प्लेगच्या साथीमुळे धामणगाव हे पूर्णतः उजाड झालं आणि या गावातील ग्रामस्थ गढी लगत राहायला आले. या भव्य गढीजवळ एक अख्खं गाव असल्यामुळं त्या गावाचं नाव गढी सोबत जुळलं आणि आज हे गाव धामणगाव गढी म्हणून ओळखलं जातं," अशी माहिती धामणगाव गढी येथील रहिवासी विनायक फाटकर आणि रमेश जोशी यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
500 वर्षांपूर्वीची निर्मिती : कुठल्याही प्रकारे दगड किंवा विटांचा वापर न करता केवळ पांढऱ्या मातीद्वारे सुमारे शंभर ते दीडशे फूट उंच अशी ही गढी उभारण्यात आली. दगड, विटांचा वापर न करता केवळ पांढऱ्या मातीचा वापर करून गढी उभारण्याचं काम विदर्भात 1572 मध्ये इमादशाहीच्या काळात सुरू झालं. सुमारे पाचशे वर्षांपूर्वी या गढीचं बांधकाम करण्यात आल्याचा अंदाज आहे अशी माहिती इतिहास अभ्यासक प्राध्यापक डॉ. वैभव मस्के यांनी 'ई टीव्ही भारत' शी बोलताना सांगितलं.
गढीची माती नेमकी आली कुठून? : "बांधकामासाठी अतिशय मजबूत असणारी गढीची माती अर्थात पांढरी माती ही राजस्थान, पंजाब आणि हरियाणात आढळते. विदर्भात ही पांढरी माती नेमकी कशी उपलब्ध झाली? याबाबत खरंतर संशोधनाची गरज आहे," असं श्री. शिवाजी कृषी महाविद्यालयातील माती परीक्षण तज्ज्ञ प्रा.डॉ. दीपक पाडेकर 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले. "पूर्वी सिमेंट उपलब्ध नव्हतं, त्यामुळं अनेक गावांमध्ये पांढऱ्या मातीची टिकाऊ घर बांधली जायची. उन्हाळ्यात ही माती थंडगार राहाते, विशेष म्हणजे पावसाळ्यात देखील ही माती टिकून राहणारी आहे. या मातीत पूर्वी नैसर्गिक पदार्थांद्वारे प्रक्रिया करून अतिशय मेहनतीन बांधकामासाठी तयार केलं जात असावं. गढीची ही माती अर्थात पांढऱ्या मातीवर संशोधनाची गरज असून संशोधनाअंती या मातीमध्ये दडलेलं रहस्य उलगडेल," असं देखील प्रा. डॉ. दीपक पाडेकर म्हणाले.
हेही वाचा
- कंगाल व्हायचं असेल तर शिव्या देत राहा, 'या' ग्रामपंचायतीचा अनोखा ठराव
- कोल्हापुरातील 'या' गावाचा विषयच "लय हार्ड", वाहनांच्या नंबरवरून ओळखली जातात घरं
- 'इंद्रायणी भाताचं हब'! संपूर्ण गावच करतंय भाताची शेती, पाहा स्पेशल रिपोर्ट