अमरावती : सातपुडा पर्वतरांगेत विस्तारलेल्या मेळघाटात काही ठिकाणी सतीशिळा आढळतात. युद्धभूमीत आपल्या पतीसह सती जाणाऱ्या तसंच आपलं पावित्र्य जपण्यासाठी सती गेलेल्या महिलांच्या स्मरणात सतीशिळा तयार करून त्या विशिष्ट ठिकाणी ठेवण्याची प्रथा मेळघाटात वास्तव्यास असणाऱ्या गवळी साम्राज्याच्या काळात रुजली होती. चिखलदरा तालुक्यात घनदाट जंगलात वसलेल्या बदनापूर या गावालगत एका शेत शिवारात अशीच सतीशिळा आढळते. स्थानिक रहिवासी देव मानून या सतीशिळेची पूजा करतात. विशिष्ट अशा दगडावर अर्थात सतीशिळेवर चंद्र, सूर्य, महिला अर्थात सतीचा हात यासोबतच खालच्या भागात घोड्यावर बसलेले स्त्री-पुरुष शिळेवर कोरले आहेत. या शिळेच्या वरच्या भागात एक कळस कोरण्यात आला. सतीशिळेची परंपरा, प्रथा नेमकी काय आहे? सती प्रथा भारतात कशी रुजली? तिचा अस्त कसा झाला? या संदर्भात "ईटीव्ही भारत"चा हा स्पेशल रिपोर्ट.
बदनापूर गावालगत अशी आहे सतीशिळा :"मेळघाटच्या जंगलात वसलेल्या चिखलदरा तालुक्यात बदनापूर या गावालगत एका शेतात रस्त्याच्या कडेला अनेक वर्ष जुनी अशी सतीशिळा आढळून आली. या सतीशिळेवर महिलेचा डावा हात असून हातात महिलेच्या सौभाग्याचं लेणं असणाऱ्या बांगड्या कोरलेल्या आहेत. यासोबतच चंद्र सूर्य अंकित केलं असून जोपर्यंत चंद्र, सूर्य राहतील, तोपर्यंत त्या महिलेचं अमरत्व अबाधित राहील, असं दर्शवण्याचा प्रयत्न सतीशिळेवर असणाऱ्या सूर्य आणि चंद्राच्या माध्यमातून करण्यात आला. संबंधित महिला ज्या परिस्थितीत सती गेली, तो प्रसंग सतीशिळेच्या खालच्या बाजुला कोरण्यात आला," अशी माहिती या सतीशिळेचा शोध लावणारे शिव स्वराज्य प्रतिष्ठानचे प्रमुख शिवा काळे यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना दिली.
महिलांची विटंबना टाळण्यासाठी रूढ झाली सती प्रथा :"भारतात परकीय आक्रमणांना सुरुवात झाली, त्यावेळी युद्धात मारल्या जाणाऱ्या सैनिकांच्या पत्नींची विटंबना होऊ नये, या उद्देशानं सती प्रथा रूढ झाली. मात्र, नंतरच्या काळात सती प्रथेला विकृत स्वरूप आलं," असं शिवा काळे म्हणाले. "मेळघाटात सात, आठ ठिकाणी सतीशिळा बघायला मिळतात. पश्चिम महाराष्ट्र किंवा कर्नाटकात मोठ्या प्रमाणात सतीशिळा आढळतात. मेळघाटात गवळी समाजामध्ये सतीशिळांची पूजा केली जाते. मेळघाटात असणारा गवळी समाज हा लढवय्या यादव साम्राज्यापैकीच एक असावा, या समाजाच्या स्त्रियांनीही संघर्षात सहभाग घेतला. अनेक लढायांमध्ये त्या सहभागी होत्या, या महिलांना आलेल्या वीर मरणाचं प्रतीक म्हणून या भागात सतीशिळा निर्माण करण्यात आल्या," असं देखील शिवा काळे सांगितलं.
महाभारतात सती प्रथेचा उल्लेख : "महाभारताच्या काळात माद्री ही पंडू राजाची बायको सती गेल्याचा उल्लेख येतो. पाचव्या शतकात गुप्त घराण्याचं राज्य भारतात होतं. त्यामध्ये गोपीनाथ नावाचा एक मांडलिक राजा होता, त्याची बायको देखील सती गेल्याचा उल्लेख आहे. आठव्या शतकाच्या शेवटी सम्राट हर्षवर्धनची बहीण राजश्री ही सती जाण्यास तयार झाली, मात्र हर्षवर्धननं तिला जाऊ दिलं नाही. या प्रसंगाचा उल्लेख बाणभट्टांच्या हर्षचरित या ग्रंथात येतो," अशी माहिती इतिहासाचे अभ्यासक प्रा. डॉ. वैभव मस्के यांनी "ईटीव्ही भारत" शी बोलताना दिली.
बाराव्या शतकात रूढ झाली प्रथा : "भारतात सती प्रथा ही 12 व्या शतकात रूढ झाली. आपल्या पतीसोबतच स्त्रियांना जिवंत जाळणं याच काळात सुरू झालं. सतीच्या नावाखाली संपत्तीचं हरण करणं, हा कदाचित त्यावेळचा उद्देश असावा. या प्रथेसाठी महिलेच्या दिराकडूनच हट्ट केला जात होता आणि या प्रथेला तत्कालीन समाज व्यवस्थेनं देखील मान्यता दिली असावी," अशी मांडणी प्रा. डॉ. वैभव मस्के यांनी केली.