मुंबई-चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियन यांच्या संशयास्पद मृत्यूबाबतचे गूढ अद्याप दूर झालेले नाही. या प्रकरणी चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयात 2023 मध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर अद्याप सुनावणी झालेली नाही. या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात 27 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.
आदित्य ठाकरेंकडून हस्तक्षेप याचिका दाखल :मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी बुधवारी 5 फेब्रुवारी रोजी आले. तेव्हा याचिकादारांच्या वकिलांनी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी दोन आठवड्यांचा वेळ मागितला, त्यावर खंडपीठाने त्यांची विनंती मान्य केली आणि त्यांना दोन आठवड्यांचा वेळ दिला. हे प्रकरण पुढील सुनावणीसाठी 27 फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आलंय. सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट लिटिगंट असोसिएशनचे अध्यक्ष रशिद खान पठाण यांनी या प्रकरणी जनहित याचिका दाखल केलीय. त्यांनी या प्रकरणात सीबीआयला प्रतिवादी केलंय. ही जनहित याचिका दाखल केल्यानंतर राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी 2023 मध्येच या प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती.
सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर प्रकरण सीबीआयकडे : आदित्य ठाकरे यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील सुदीप पासबोला बाजू मांडणार आहेत. या प्रकरणात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका स्वीकारायची की फेटाळायची याचा निर्णय न्यायालय घेईल आणि आम्ही आमच्या अशिलाची बाजू मांडू, अशी माहिती पासबोला यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. 14 जून 2020 ला सुशांत सिंह राजपूत त्याच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळला होता. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र, त्याच्या वडिलांनी बिहारमध्ये केलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण पुढील चौकशीसाठी सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. त्यानंतर आजपर्यंत मागील पाच वर्षांत सीबीआयला या प्रकरणात काही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. सुशांत सिंहची माजी व्यवस्थापक असलेली दिशा सालियन ही 8 जून 2020 रोजी तिच्या मालाड येथील निवासस्थानी 14 व्या मजल्यावरून खाली पडली आणि त्यामध्ये तिचा मृत्यू झाला होता.
सुशांत सिंह राजपूत अन् दिशा सालियन मृत्यूप्रकरणी जनहित याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी होणार - SUSHANT SINGH RAJPUT DEATH CASE
सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट लिटिगंट असोसिएशनचे अध्यक्ष रशिद खान पठाण यांनी या प्रकरणी जनहित याचिका दाखल केलीय. त्यांनी या प्रकरणात सीबीआयला प्रतिवादी केलंय.
![सुशांत सिंह राजपूत अन् दिशा सालियन मृत्यूप्रकरणी जनहित याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी होणार Mumbai High Court](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/07-02-2025/1200-675-23495937-thumbnail-16x9-mumbaihighcourt-54-aspera.jpg)
मुंबई उच्च न्यायालय (Source- ETV Bharat)
Published : Feb 7, 2025, 6:45 PM IST